ताज्या बातम्या

साताऱ्यात सकल मातंग समाजाचा उपवर्गीकरणासाठी मोर्चा……..

सातारा

(अजित जगताप) : सर्वोच्च न्यायालयाचे तात्कालीन न्यायमूर्ती भूषण गवई यांनी अनुसूचित जातीच्या आरक्षणांमध्ये उपवर्गीकरण करण्याची शिफारस राज्य सरकारला दिली आहे. त्याची त्वरित अंमलबजावणी करावी. या मागणीसाठी आज सातारा जिल्ह्यातील सकल मातंग समाजाच्या वतीने सातारा शहरात भर उन्हात मोर्चा काढण्यात आला. या वेळेला जय लहुजी… जय भीम… जय शिवराय… जय अण्णाभाऊ… जय संविधानाच्या घोषणाने परिसर दणाणून गेला होता . संविधानाचा आधार.. उपवर्गीकरणाचा निर्धार… अशी टॅगलाईन देऊन अनेकांनी आपल्या गळ्यात पिवळा गमजा व निळा झेंडा घेऊन मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी झाले होते. प्रारंभी सातारा शहरातील मुख्य रस्त्यावरील वीर लहुजी वस्ताद, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मातंग महिला व पुरुष , तरुण वर्ग गटा गटाने मोर्चात सहभागी होत होते. सामाजिक न्यायासाठी सकल मातंग समाजाच्या वतीने मोर्चाचे नेतृत्व मातंग समाजाचे नेते किशोर गालफाडे, अमर गायकवाड, अण्णा वायदंडे, अमोल पाटोळे, गणेश वाघमारे, अशोक भिसे, डॉ. रमाकांत साठे, उमेश चव्हाण, सुरेश बोतालजी, तानाजी घाडगे,मंगला वायदंडे, सुनंदा कांबळे, जनाबाई पाटोळे, संगीता साठे, जयश्री बडेकर, संजय कांबळे, विशाल चव्हाण, जगन्नाथ कांबळे, प्रदीप ढोबळे यांच्यासह मान्यवर प्रतिनिधी उपस्थित होते. अत्यंत शांततेने हा मोर्चा सातारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर आला. यावेळी अनेक मान्यवरांनी प्रसार माध्यमांशी बोलताना उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. सर्वोच्च न्यायालयाने संविधानाचा सन्मान राखून घेतलेलाहा निर्णय आहे. मातंग समाज मुख्य प्रवाहात येण्यास उत्सुक असून यासाठीच उपवर्गीकरण महत्त्वाचे आहे. सध्या ५९ जातींपैकी बहुतांश जातीने उपवर्गीकरणाला राजकीय दृष्ट्या विरोध केलेला आहे. या मोर्चाला भाजपने छुपा पाठिंबा दिला असल्याचे बोलले जात होते. परंतु ती अफवा ठरली आहे. सकल मातंग समाजाचे स्वबळावर सातारा शहरातून काढलेल्या या मोर्चाने खऱ्या अर्थाने समाजाची एकजुटीचे दर्शन घडले आहे. मातंग तरुणांच्या उत्साह व संयम महत्त्वाचा असून उपवर्गीकरणाच्या माध्यमातून मातंग समाजाची प्रगती होत असेल तर सरकारनेही त्यांच्या हक्कासाठी उपवर्गीकरण करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. यासाठी महायुती सरकारलाही इशारा देण्यात आलेला आहे. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राजकीय पक्ष बाजूला ठेवून सर्व मातंग समाज एकत्र आल्याने खऱ्या अर्थाने मातंग समाजात जनजागृती झाल्याचे मानण्यात येत आहे. यावेळी मोर्चाला सहकार्य करणाऱ्या मातंग बांधवांचेही कौतुक करण्यात आले. दरम्यान, या मोर्चामध्ये आरक्षणातून निवडून आलेले मातंग समाजातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील एकही सदस्य उपस्थित नव्हते. याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आले. विधान परिषदेच्या निवडणुकीपेक्षाही समाजाचा प्रश्न महत्त्वाचा असतो. याची त्यांना आठवण करून दिली आहे. ……………………………… फोटो- मातंग समाजाच्या मोर्चा व नेते (छाया- अजित जगताप, सातारा)

Scroll to Top