मुंबई(रमेश औताडे) : शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्या सामान्य गुंतवणूकदारांसाठी उपयोगी ठरणारे नवे ट्रेडिंग तंत्रज्ञान डिफाइनएज सिक्युरिटीज ब्रोकिंग प्रा. लि. यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत सादर केले. या नव्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेअर बाजारातील व्यवहार अधिक सोपे, शिस्तबद्ध आणि नियमांवर आधारित करता येणार आहेत.
आतापर्यंत अनेक गुंतवणूकदार अंदाजांवर किंवा भावनांवर आधारित ट्रेडिंग करत होते. मात्र, या नव्या तंत्रज्ञानामुळे ठराविक नियमांनुसार आणि ठरवलेल्या रणनीतीनुसार व्यवहार करता येणार असल्याचे कंपनीने सांगितले. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक प्रशांत शाह यांनी या प्लॅटफॉर्मची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या प्रणालीमुळे इंट्राडे तसेच दीर्घकालीन (पोजिशनल) ट्रेडिंग, शेअर्स, फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये एकाच ठिकाणी करता येणार आहे. विविध चार्ट, किंमत चढ-उतार आणि ऑप्शन चेनच्या आधारे व्यवहार आखता येतील.
या तंत्रज्ञानाचा उपयोग करून गुंतवणूकदार आपली ट्रेडिंग रणनीती स्वयंचलित करू शकतात. त्यामुळे मानवी चुका कमी होतील आणि व्यवहारात शिस्त राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी अंदाज नव्हे तर नियम आणि शिस्त महत्त्वाची आहे. आमचा हा नवा प्लॅटफॉर्म सामान्य गुंतवणूकदारांनाही व्यावसायिक पद्धतीने ट्रेडिंग करण्यास मदत करेल.




