Sunday, November 2, 2025
घरमहाराष्ट्रश्री बाळसिद्ध मंदिर शेजारील इमारतीवरून वादाची ठिणगी; यात्रेच्या परंपरेला धोका!

श्री बाळसिद्ध मंदिर शेजारील इमारतीवरून वादाची ठिणगी; यात्रेच्या परंपरेला धोका!

प्रतिनिधी : मौजे घोगाव (ता. कराड) श्री बाळसिद्ध मंदिर परिसरात सुरू असलेल्या नव्या इमारतीच्या बांधकामामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष उसळला आहे. खासदार निधीतून मंजूर झालेली ही इमारत थेट ग्रामसचिवालयाच्या शेजारी उभारली जात असून, या ठिकाणी दरवर्षी पारंपरिकपणे होणाऱ्या श्री बाळसिद्धनाथ यात्रेच्या छबिना च्या मार्गावरच अडथळा निर्माण होणार असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिर परिसरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत यात्रा भरते. त्या वेळी श्री बाळसिद्धनाथांचा छबिना मंदिर प्रदक्षिणा करतो, तसेच सासन काट्या, पालख्या आणि भजन मंडळे या सोहळ्यात सहभागी असतात. मात्र, आता नव्या इमारतीच्या बांधकामामुळे छबिनाचा पारंपरिक मार्गच अडवला जाणार असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

स्थानिक ग्रामस्थ सांगतात, मंदिराच्या शेजारी आधीच शेड उभारण्यात आले आहे, जिथे यात्रेदरम्यान अन्नदान आणि उत्सवाचे आयोजन होते. उर्वरित जागा ही छबिना साठी अत्यावश्यक आहे. तरीदेखील काही जणांच्या हट्टामुळे आणि योग्य नियोजना शिवाय नव्या इमारतीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे धार्मिक परंपरा धोक्यात येत आहेत.

दरम्यान, ग्रामस्थांचे म्हणणे आहे की विकासकामांच्या नावाखाली गावकऱ्यांना विश्वासात न घेता, नियोजनाशिवाय आणि हेकेकोर पद्धतीने कामे राबवली जात आहेत. नव्या इमारतीमुळे ग्रामपंचायत इमारतही झाकली गेल्याची चर्चा आहे. तसेच, मागील वर्षी ग्रामपंचायत कार्यालयासमोर २० लाख रुपयांच्या खर्चाने बसवण्यात आलेले फेवर ब्लॉक ही या कामासाठी तोडण्यात आले असून, त्यामुळे निधीचा अपव्यय झाल्याचीही चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे गावात मोठी खळबळ उडाली असून अनेक ग्रामस्थ लवकरच संबंधित खासदारांची भेट घेऊन प्रत्यक्ष परिस्थिती मांडण्याच्या तयारीत आहेत. भविष्यात धार्मिक परंपरा आणि ग्रामस्थांचा भावना

भंग टाळण्यासाठी प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments