ताज्या बातम्या

मनोरंजन विश्वात ‘डीडीएम फिल्मी’ची दमदार एंट्री; सेलिब्रिटींच्या उपस्थितीत यूट्यूब चॅनलचे शानदार लॉन्चिंग

मुंबई : गेली तब्बल सोळा वर्षे निर्भीड आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे धगधगती मुंबई वृत्तपत्र सातत्याने कार्यरत असून आता या वृत्तपत्राने सतराव्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. बदलत्या काळानुसार सोशल मीडियाचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन २०२२ मध्ये डीडीएम न्यूज हे यूट्यूब न्यूज चॅनल सुरू करण्यात आले होते. या चॅनलला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता मनोरंजन विश्वातही दमदार पाऊल टाकण्यात आले आहे.
कलाकारांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवणे, त्यांच्या संघर्षमय प्रवासाला व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि मनोरंजन क्षेत्रातील वास्तव जनतेसमोर आणण्याच्या उद्देशाने डीडीएम फिल्मी या नव्या यूट्यूब चॅनलचे भव्य लॉन्चिंग गुरुवार, ७ मे रोजी करण्यात आले.
दादर येथील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात महाराष्ट्र बाजारपेठेच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी महाराष्ट्र बाजारपेठेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कौतिक दांडगे, सीईओ अनुजा दांडगे तसेच पार्श्वगायिका कविता राम यांच्या प्रमुख उपस्थितीत डीडीएम फिल्मीचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले.
चॅनल लॉन्च होताच उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि उत्साहपूर्ण वातावरणात डीडीएम फिल्मीचे स्वागत केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, कलाकार आणि सेलिब्रिटी उपस्थित होते. अनेक सेलिब्रिटींनी या नव्या चॅनलला मनापासून शुभेच्छा देत भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.
यावेळी धगधगती मुंबईचे संपादक भीमराव धुळप,सहसंपादक संतोष लिंबोरे पाटील तसेच युवा पत्रकार ओमकार भिमराव धुळप उपस्थित होते.
मनोरंजन क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करत कलाकारांच्या प्रश्नांना न्याय देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या डीडीएम फिल्मी या चॅनलकडून प्रेक्षकांना दर्जेदार आणि वास्तववादी मनोरंजन पत्रकारितेची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Scroll to Top