पुणे(अजित जगताप) : “समर्थ प्रतिष्ठान” आणि “प्रिझन मिनिस्ट्री इंडिया” तर्फे कैद्यांसाठी रक्षाबंधन व कारागृह ध्वज दिन सोहळा येरवडा खुला कारागृह येथे साजरा झाला. सुधारसेवा विभागाचा १ सप्टेंबर हा दिवस “कारागृह ध्वज दिन” म्हणून मोठया उत्साहात साजरा होतो . या सोहळयाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक डॉ. सुहास वारके आणि विशेष कारागृह महानिरीक्षक श्री. योगेश देसाई तसेच पुणे विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक श्री. सुनील ढमाळ यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली येरवडा खुले कारागृहात दिनांक 27 ऑगस्ट ते एक सप्टेंबर या कालावधीमध्ये “ध्वज सप्ताह ” साजरा करण्यात येत आहे.
या ध्वज सप्ताहातील दुसऱ्या दिवशी कैद्यांसाठी एका विशेष “रक्षाबंधन” कार्यक्रम घेण्यात आला. येरवडा खुल्या कारागृहात खुल्या वातावरणामध्ये भावनिक नाते निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. समर्थ प्रतिष्ठान वतीने या वेळेला ढोल ताशा, ध्वज व ढाल तलवार पथक, पुणे आणि प्रिझन मिनिस्ट्री इंडिया, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या आनंदी सोहळ्याला सामाजिक बांधिलकीची झालर लावण्यात आली होती. कारागृहातील बंदी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडून ठेवणे आणि त्यांच्यामध्ये आपुलकीची भावना निर्माण करणे. हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. हा उद्देश सफल झाला आहे.
या प्रसंगी समर्थ प्रतिष्ठान, पुणेचे अध्यक्ष संजय सातपुते व प्रतिष्ठानचे इतर महिला सदस्य तसेच प्रिझन मिनिस्ट्री इंडिया (पुणे विभाग) चे प्रमुख जेकब अँथनी आणि त्यांच्यासोबत बारा महिला सदस्या यांची उपस्थिती खऱ्या अर्थाने बहिणीचे कर्तव्य पार पडत होत्या. समर्थ प्रतिष्ठान, पुणे व प्रिझन मिनिस्ट्री इंडियाच्या महिला सदस्यांनी येरवडा खुल्या कारागृहातील कैद्यांना बहिणीच्या हातून राखी बांधून समाजाचे रक्षण करण्याचाही सल्ला दिला. तसेच कारागृहातून बाहेर पडल्यानंतर उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुनर्वसनासाठी शुभेच्छा दिल्या. रक्षाबंधनाच्या या पवित्र धाग्यामुळे अनेक बंदी बांधव भावूक झाले होते. अनेकांना आपल्या आयुष्यातील रक्षाबंधनची तीव्रतेने आठवण झाली.
या संपूर्ण कार्यक्रमासाठी येरवडा खुले जिल्हा कारागृहाचे अधीक्षक श्री शामकांत चं. शेडगे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी श्री नागेश कांबळे यांनी रक्षाबंधन कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे आणि महिला भगिनींचे स्वागत केले. या कारागृहात राबवण्यात येत असलेल्या अशा उपक्रमांमुळे कैद्यांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडण्यास मदत होते, अशी भावना अधीक्षक श्री शामकांत चं. शेडगे यांनी व्यक्त केली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभेदार सुनिल गायकवाड, दत्तात्रय चव्हाण, श्री चंद्रकांत खांदवे, हवालदार राजेंद्र धनगर, प्रकाश भोसले, श्रीमती वैशाली थोरात, कारागृह महिला शिपाई मोनिका लांडगे, मिसबा सय्यद, कारागृह शिपाई याकुब शेख, वैभव पाटील, विजयकुमार दिवेकर, तौसीफ शेख, याकुब शेख, अशोक होले, महेश हळदकर, महेंद्र लोहकरे इत्यादींना मेहनत घेतली. या कार्यक्रमासाठी कारागृहातील सर्व शिक्षाबंदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. येरवडा खुल्या कारागृहमध्ये आपुलकीची कायद्यांना वागणूक मिळत असल्याने त्यांच्यामध्ये परिवर्तन घडत आहे. सजा देण्यापेक्षा माणसाच्या हातून कोणताही गुन्हा घडू नये. यासाठी हे छोटसं रोपट लावण्यात येत आहे. भविष्यात प्रत्येकाने रागावर संयम ठेवून मानवता जपावी. असाच हा कार्यक्रम होता. अशी प्रतिक्रिया उमटत आहे. —————————— फोटो- येरवडा खुला कारागृहात रक्षाबंधन व मार्गदर्शन (छाया- निनाद जगताप, येरवडा)




