मुंबई : अंधेरी पश्चिम येथील भवन्स कॉलेजमध्ये गेल्या सुमारे ३० वर्षांपासून माळी म्हणून काम करणाऱ्या सौ. सुनिता नवघरे यांना गेल्या काही वर्षांपासून मानसिक त्रास देण्यात येत असून, वेतन वेळेवर अदा केले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या मूलभूत सुविधांमध्येही अडथळे निर्माण केले जात असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
या संदर्भात राष्ट्रीय सचिव श्री. रविशंकर सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भवन्स कॉलेज परिसरात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
सौ. नवघरे यांच्या निवासाच्या प्रश्नाबाबतही आयोजकांनी गंभीर आरोप केले आहेत. भवन्स कॉलेज परिसरात राहण्यासाठी एसआरएच्या माध्यमातून दोन सदनिका मंजूर झाल्याचा दावा करण्यात आला असून, संबंधित कागदपत्रे तयार असतानाही त्यांना त्या सदनिकांचा वापर करण्याचा अधिकार दिला जात नसल्याचे सांगण्यात आले.
तसेच परिसरातील तलावातून पाणी भरण्यासाठी गेलेल्या त्यांच्या एका नातेवाईकाचा यापूर्वी दुःखद मृत्यू झाल्याचेही आयोजकांनी पत्रकार परिषदेत नमूद केले.
या सर्व प्रश्नांकडे प्रशासन व संबंधित संस्थेचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे रविशंकर सूर्यवंशी यांनी सांगितले.
या आंदोलनाची माहिती देण्यासाठी २४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ ते ४ वाजता मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान, मुंबई येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. पत्रकार परिषदेत संबंधित प्रकरणाची माहिती देण्यात आली. आंदोलनाची दखल घेऊन जास्तीत जास्त पत्रकार व छायाचित्रकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




