ताज्या बातम्या

जिल्हा बँक सेवक श्री. पवारांनी जपला जिल्हा परिषद शाखेत प्रामाणिकपणा…

सातारा(अजित जगताप) : स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती करून प्रामाणिकपणाने सेवा देण्याचा संकल्प केला होता. त्याला सत्तेसाठी तडा जात असतानाच जिल्हा बँकेच्या सेवक श्री अनिल पवारांनी प्रामाणिकपणा जपून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे दागिने परत दिले. त्यांच्या प्रामाणिकपणाचे जिल्हाभर कौतुक होत आहे.
लॉकरवर विसरलेले लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि प्रामाणिकपणाचा संगम पाहण्यास मिळाला.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विकास सोसायटीच्या ठरावामुळे सध्या राडेबाजी सुरू आहे. अशा वेळेला जिल्हा बँकेची अब्रू वाचवण्याचा प्रयत्न सेवक श्री अनिल पवारांनी करून दाखवला आहे. श्री पवार जिल्हा बँकेच्या लॉकरजवळ गेले असता त्यांना लॉकरवर एक पिशवी आढळली.
पिशवी तातडीने सुरक्षित ठिकाणी ठेवून त्यांनी शाखाप्रमुख श्री. विवेक मोरे व कॅशियर सौ. रुपाली लावंड यांना त्याची माहिती दिली. पिशवीच्या बाहेरून तिच्यातील वस्तूंची माहिती मिळत नसल्याने, संपूर्ण पारदर्शकता राखत सी.सी.टी.व्ही.च्या निगराणीखाली पिशवी उघडण्यात आली. त्यातील कापडी पिशवीवर असलेल्या नावावरून जिल्हा परिषद कर्मचारी सौ. सुजाता तुपे यांची असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर शाखाप्रमुख श्री. विवेक मोरे यांनी सौ. तुपे यांच्याशी संपर्क साधून त्यांना शाखेत बोलावून घेतले. श्री. अक्षय बोबडे, सौ. सुप्रिया देशमुख व कु. प्रज्ञा आगुंडे यांच्या उपस्थितीत पिशवी उघडण्यात आली. त्यामध्ये सौ. तुपे यांनी सांगितलेले सोन्याचे दागिने तसेच पती व मुलांच्या चांदीच्या वस्तू जशाच्या तशा असल्याचे आढळले.
लाखो रुपयांचे दागिने सुरक्षित आणि प्रामाणिकपणे परत मिळाल्याने सौ. तुपे यांना सुखद धक्काच बसला. त्यांनी शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
सातारा जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाची ही पहिलीच घटना नसून, सन २०२० मध्ये परळी शाखेत शाखाप्रमुख म्हणून कार्यरत असताना श्री. विवेक मोरे यांनी एटीएम कार्डच्या आधारे एका आरोग्य सेवकाचा संपर्क शोधून त्याचे रोख रकमेसह हरवलेले पाकीट परत केले होते. तर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यात एका बँकेच्या सेवकाने संचालकांच्या शिक्षण संस्थेला देणगी दिली होती. त्याची चर्चा झाली नंतर त्यामध्ये त्या सेवकाचा भ्रष्टाचार उघडकीस आला होता. दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. तरीही या निमित्त आठवणीत आले आहेत.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सेवकाच्या प्रामाणिकपणाबद्दल बँकेच्या सरव्यवस्थापक डॉ. राजेंद्र सरकाळे, श्री. राजीव गाढवे, श्री. राजेंद्र भिलारे व सातारा जिल्हा बँक व परिषदेचे पदाधिकारी आणि पत्रकार विशाल कदम, अजित जगताप यांनी कौतुक केले आहे. बाजार फुलांचा भरला. मज तुळस कशी दिसेना? ती प्रामाणिकपणाची तुळस दिसली अशी चर्चा सुरू झाली आहे.

—————————————–
फोटो- सातारा जिल्हा बँकेच्या सेवकांनी प्रामाणिकपणाने दागिने परत दिले.. (छाया- निनाद जगताप सातारा)

Scroll to Top