ताज्या बातम्या

येवती विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप

कराड (वार्ताहर) : चंद्रभागा रूरल डेव्हलपर्स यांच्या वतीने येवती विद्यालय, येवती येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाने झाली. ध्वजारोहण अनिल शेवाळे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून अशा उपक्रमांचे आयोजन करणे गरजेचे असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

या कार्यक्रमास सरपंच हिराबाई गुरव, विक्रम शेवाळे, शिवाजी शेवाळे, समाधान सोरटे, सुरेश शेवाळे यांच्यासह विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चंद्रभागा रूरल डेव्हलपर्सच्या या सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळाला असून, संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

Scroll to Top