ताज्या बातम्या

गरजू व दिव्यांग विद्यार्थ्यांना वह्या वाटप; ‘प्रोजेक्ट विद्या २’ उपक्रम उत्साहात

मुंबई (शांताराम गुडेकर) : शिवसेना प्रणीत राष्ट्रीय शिव स्वराज्य सेना आणि लायन्स क्लब ऑफ मुंबई सफ्रॉन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानवतावादी दिनानिमित्त चेंबूर येथील रोचिराम टी. थडानी हायस्कूल फॉर हिअरिंग हॅण्डिकॅप्ड, कलेक्टर कॉलनी, चेंबूर कॅम्प येथे ‘प्रोजेक्ट विद्या २’ या उपक्रमांतर्गत गरजू व दिव्यांग विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
शिक्षणाला पाठबळ देणे तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सातत्याने पुढे जाण्यास प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
यावेळी शिवसेना आमदार तुकाराम काते यांनी शिक्षण, आरोग्य आणि समाजकल्याणाच्या क्षेत्रात राष्ट्रीय शिव स्वराज्य सेना व लायन्स क्लब ऑफ मुंबई सफ्रॉन यांच्या माध्यमातून भविष्यातही विविध सामाजिक उपक्रम राबविले जातील, असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवस्वराज्य सेनेचे तसेच लायन्स क्लब ऑफ मुंबई सफ्रॉनचे अध्यक्ष लायन जितेंद्र सकपाळ, क्लबचे सचिव लायन संजू ससमल आणि प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर भाग्यश्री वर्तक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
कार्यक्रमास फर्स्ट व्हाइस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन सायरस सुरती, फर्स्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रदीप पारेख, लायन्स क्लब ऑफ सफ्रॉनचे एक्स्टेंशन चेअरमन लायन विजय रायमाने, डिस्ट्रिक्ट 3231 A2च्या लायन पद्मा राममूर्ती, शाळेचे ट्रस्टी पपन सहेजा, मुख्याध्यापिका वनिता धुरी, म्युनिसिपल शाळेच्या मुख्याध्यापिका सुमन पाटील, राष्ट्रीय शिव स्वराज्य सेनेच्या राज्य प्रवक्त्या सुषमा सकपाळ राऊत, रायगड जिल्हाध्यक्ष सुखदेव सस्ते, ठाणे जिल्हा संपर्क अध्यक्षा स्मिता देवकर पाटील, जुईनगर सचिव धनाजी जगताप, लायन्स क्लबचे सदस्य लायन हबीब अन्सारी, लायन वीणा दोनवलकर यांच्यासह शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
दिव्यांग आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला.

Scroll to Top