ताज्या बातम्या

संघर्षातून विद्यार्थ्यांना मिळणारा अनुभव शिक्षण देतो – आयपीएस बिरदेव ढोणे

भुईंज (अजित जगताप): विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये वाटचाल करताना यश-अपयशाच्या विचारात अडकून पडू नये. यश मिळेपर्यंत संघर्ष केला पाहिजे. संघर्षातून आलेला अनुभव दिशा दाखवतो असे प्रतिपादन आयपीएस अधिकारी बिरदेव ढोणे यांनी केले.
पांचवड, ता. वाई येथे आय.एफ.एस. राजेश स्वामी अभ्यासिका व तिरंगा एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. कांताताई नलावडे, स.पो.नि. पृथ्वीराज ताटे, प्राचार्य आर. एस. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
आजच्या काळात पालकांकडून शालेय जीवनापासूनच मुलांवर अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी निर्णय लादले जातात. काही पालकांची ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. मुलांना स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ द्या. त्यांना यशाबरोबरच अपयशाचा अनुभवही घेऊ द्या. कारण अनुभवातूनच व्यक्तिमत्त्व घडते आणि शिक्षण व संस्कारांची खरी जाणीव होते, चांगली दिशा मिळते. असे प्रतिपादन आयपीएस अधिकारी ढोणे यांनी केले.
यावेळी त्यांनी व्यक्तिगत पातळीवर जीवनातील संघर्षमय प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ध्येय गाठताना आलेले अनेक प्रसंग, अडचणी आणि अनुभवांचे दाखले देत त्यांनी विद्यार्थ्यांना सातत्य, मेहनत, संयम आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राज्यसेवा परीक्षेत यश मिळविलेले यशस्वी विद्यार्थी आरोग्य अधिकारी रुपेश मोरे, फॉरेन्सिक अधिकारी अभिनया गायकवाड व श्रेयस इथापे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संस्थेचे मार्गदर्शक-सचिव जयवंत पवार यांनी स्वागत केले. प्राचार्या वनिता पवार यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांनी आभार मानले. सूत्रसंचालन पत्रकार जयवंत पिसाळ व विजया पवार यांनी केले.
कार्यक्रमास स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, द्रोणाचार्य करिअर अकॅडमीचे विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आईच्या शिकवण संस्कारांनी आयपीएस अधिकारी ढोणे भावुक झाले होते. त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या आणि हा भावनिक प्रसंग पाहून उपस्थितांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले. पुणे- सातारा महामार्गावरून ये-जा करताना या परिसरात पुन्हा येत राहीन,” असे त्यांनी सांगताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना उत्स्फूर्त दाद दिली. या व्याख्यानाने खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आहे. .

Scroll to Top