मुंबई : लावणी कलावंत महासंघ, मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघ, मुंबई आणि मराठी रंगभूमी निर्माता महासंघ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविंद्र नाट्य मंदिर, मुंबई येथे सांस्कृतिक कार्यमंत्री मा. श्री. आशिष शेलार यांची भेट घेण्यात आली.
यावेळी लोककला, लावणी आणि वाद्यवृंद या कलाक्षेत्राशी संबंधित विविध प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कलावंत आणि निर्मात्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.
या मागण्यांबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित विषयांवर तातडीने निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे तसेच आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मा. श्री. मेघराज राजेभोसले आणि प्रमुख कार्यवाह श्री. सुशांत शेलार उपस्थित होते. त्यांनी या चर्चेसाठी मोलाचे सहकार्य केले.
लोककला, लावणी आणि वाद्यवृंद क्षेत्रातील कलावंतांच्या प्रश्नांना शासनस्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने संबंधित कलावंत आणि निर्मात्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या भेटीबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे आभार व्यक्त करण्यात आले.




