ताज्या बातम्या

प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड’साठी 20 सप्टेंबरपर्यंत नामांकने पाठवा; यंदापासून क्षेत्रनिहाय विशेष पुरस्कार व ‘पाटण भूषण’ पुरस्काराचे नियोजन

तळमावले (वार्ताहर) : महाराराष्ट्र शासन, मान्यताप्राप्त सहाय्य धर्मादाय आयुक्त संलग्न व आयएसओ मानांकनप्राप्त पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने विविध क्षेत्रांत आदर्शवत कार्य करणाऱ्या आणि सामाजिक जडणघडणीसाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना दरवर्षी ‘राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड’ या पुरस्काराने गौरविण्यात येते. या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष डॉ.संदीप डाकवे यांनी केले आहे. समाजासाठी अविरतपणे झटणाऱ्या सर्वसामान्यांमधील आदर्श व्यक्ती, संस्था व ट्रस्ट यांना सन्मानित करून त्यांचे कार्य समाजापुढे आणण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. यंदाच्या आठव्या वर्षाचे औचित्य साधून ट्रस्टने ‘प्राईड ऑफ स्पंदन’ हे क्षेत्रनिहाय विशेष पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सामाजिक क्षेत्रासाठी ‘प्राईड ऑफ स्पंदन–समाजभूषण पुरस्कार’, शिक्षणासाठी ‘प्राईड ऑफ स्पंदन–ज्ञानदीप पुरस्कार’, कृषी व ग्रामीण विकासासाठी ‘प्राईड ऑफ स्पंदन–कृषीरत्न पुरस्कार’, आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रासाठी ‘प्राईड ऑफ स्पंदन–आरोग्यदूत पुरस्कार’, कला व संस्कृतीसाठी ‘प्राईड ऑफ स्पंदन–कलारत्न पुरस्कार’, साहित्य व पत्रकारितेसाठी ‘प्राईड ऑफ स्पंदन–शब्दशिल्पी पुरस्कार’, महिला सक्षमीकरणासाठी ‘प्राईड ऑफ स्पंदन–स्त्री-शक्ती पुरस्कार’, क्रीडा व युवा क्षेत्रासाठी ‘प्राईड ऑफ स्पंदन–क्रीडारत्न पुरस्कार’, पर्यावरण व स्वच्छतेसाठी ‘प्राईड ऑफ स्पंदन–पर्यावरण मित्र पुरस्कार’ आणि उत्कृष्ट संस्था/ट्रस्टसाठी ‘प्राईड ऑफ स्पंदन–उत्कृष्ट संस्था गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत.
डाकेवाडीसारख्या दुर्गम भागात राहूनही संदीप डाकवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आतापर्यंत शेकडो नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून आपल्या कामाची कर्तृत्वमुद्रा समाजमनावर उमटवली आहे. या कामाची दखल घेत स्पंदन ट्रस्टला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून व शुभसंदेश देऊन ट्रस्टच्या कार्याचा गौरव केला आहे. यापूर्वी नीलकंठ खाडीलकर (पत्रकारिता), पद्मश्री डॉ. विजय शाह (वैद्यकीय), खासदार श्रीनिवास पाटील (राजकीय), अ‍ॅड.जनार्दन बोत्रे (सहकार), प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे (साहित्य), श्री गुरु श.ब्र.प्र. १०८ डॉ. नीलकंठ धारेश्वर महाराज (आध्यात्मिक) यांना स्पंदन जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रोख रक्कम रुपये ५,०००/-, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि तात्या पुस्तक असे या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप आहे.
तसेच महंत अहिल्यागिरीजी महाराज, प्रेरणादायी वक्ते डॉ. विनोद बाबर, साम टीव्ही चे नीलेश खरे, सुप्रसिद्ध गायक विजय सरतापे, दिग्दर्शक अरुण कचरे, टीव्ही ९ मराठीच्या वृत्तनिवेदिका/पत्रकार सेजल पुरवार, अभिनेते किरण माने, अभिनेत्री अश्विनी महांगडे, सिनेअभिनेत्री प्राजक्ता नवनाळे, सिनेअभिनेते योगेश पोवार, लावणीसम्राज्ञी विजया पालव, महाराष्ट्र केसरी पै. आप्पासाहेब कदम, शिवव्याख्याते प्रा. डॉ. अरुण घोडके, अभिनेत्री प्राजक्ता शिसोदे, अभिनेते रवी साळुंखे, अभिनेता सुयश शिर्के, अभिनेत्री सुनंदा शेंडे, अभिनेत्री डॉ.सीमा पाटील, अभिनेते व लेखक सचिन पाटील, उद्योजक सर्जेराव यादव, ह.भ.प. विजय महाराज रामिष्टे, मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे, पार्श्वगायिका कविता राम, दिग्दर्शक विठ्ठल डाकवे, अभिनेते पंकज काळे, विश्वविक्रमवीर गिर्यारोहक कु. अन्वी घाटगे या दिग्गजांनी स्पंदनच्या मंचावर उपस्थिती लावली आहे.
‘प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड’ने आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, या वर्षापासून पाटणच्या भूमीतील एका दिग्गज व्यक्तिमत्त्वाला प्रथमच ‘पाटण भूषण पुरस्कार’ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, तात्या पुस्तक आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप राहील. तरी सदर पुरस्कारांसाठी इच्छुक व्यक्ती, संस्था व ट्रस्ट यांनी आपल्या नामांकनासह आपल्या क्षेत्रातील केलेल्या कार्याचे फोटो, वृत्तपत्रातील बातम्यांची कात्रणे इत्यादी साहित्याचे प्रस्ताव रविवार दि.20 सप्टेंबर, 2026 पर्यंत ‘संदीप राजाराम डाकवे, आई-तात्या निवास, रो-हाऊस क्र.1, ज्ञानेश्वर कॉलनी, कांचनगंगा अपार्टमेंटशेजारी, गुरुचरण सोसायटीसमोर, सैदापूर, तालुका कराड, जिल्हा सातारा-415124 येथे पोस्टाने अथवा कुरिअरने पाठवावेत. आलेल्या नामांकमांमधून निवड समितीने निवडलेल्या पुरस्कारार्थींना एका भव्यदिव्य व शानदार सोहळ्यात दिग्गज मान्यवर आणि सेलिब्रिटींच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल, अशी माहिती डॉ.संदीप डाकवे यांनी दिली आहे.

Scroll to Top