कराड(प्रताप भणगे) : जिद्द, मेहनत आणि शिक्षणाच्या बळावर मिळवले यश; जिल्हा परिषद शाळा विठोबाचीवाडीच्या वतीने सत्कार
विठोबाचीवाडी : अत्यंत गरीब आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, मेहनत व चिकाटीच्या जोरावर शिक्षणात उल्लेखनीय यश संपादन करून इंडियन पोस्टमध्ये निवड झालेल्या आसावरी अर्जुन होळकर हिचा जिल्हा परिषद शाळा विठोबाचीवाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
आसावरी हिने आर्थिक अडचणींशी संघर्ष करत आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले. अनेक अडचणींचा सामना करत तिने मिळवलेले यश हे तिच्या कुटुंबीयांसाठी तसेच संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. तिच्या यशामुळे ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी आणि कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यावेळी आशासेविका वंदना चव्हाण मॅडम आणि जिल्हा परिषद शाळेच्या मदतनीस आरती चव्हाण यांच्या हस्ते आसावरीचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्य उपस्थित होते. उपस्थितांनी आसावरीचे अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीतूनही शिक्षणाच्या जोरावर मोठे यश संपादन करता येते, याचे आसावरी होळकर हे प्रेरणादायी उदाहरण आहे. तिच्या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांमध्येही आत्मविश्वास निर्माण झाला असून, शिक्षण आणि मेहनतीच्या जोरावर आपले ध्येय गाठण्याची प्रेरणा त्यांना मिळत आहे.
“परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि शिक्षणाच्या बळावर यश मिळवता येते,” हे आसावरीने आपल्या यशातून सिद्ध केले आहे.




