चौक : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देणारे चौक गावचे स्वातंत्र्यसैनिक स्व. विश्वनाथ रामचंद्र ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी चौक बाजारपेठेतील एका रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे. ग्रामपंचायत चौकने घेतलेल्या या निर्णयामुळे स्वातंत्र्यसैनिकाच्या देशसेवेचा आणि त्यागाचा इतिहास भावी पिढ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.
ग्रामपंचायत सरपंच रितू ठोंबरे यांनी या उपक्रमाबद्दल आनंद आणि समाधान व्यक्त केले. स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या स्थानिक स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृती जपणे ही आपली सामाजिक आणि ऐतिहासिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
सन १९४२ मध्ये महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभर ‘भारत छोडो’ आंदोलन सुरू झाले. ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध निर्णायक लढ्याचे आवाहन करत ‘करा किंवा मरा’ हा संदेश दिला. त्यानंतर ब्रिटिश सरकारने गांधीजींसह अनेक प्रमुख नेत्यांना अटक केली. त्यामुळे आंदोलनाची धुरा सामान्य जनता, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या हाती घेतली.
भारत छोडो आंदोलनाची धग रायगड जिल्ह्यातही पोहोचली होती. पनवेल येथील उरण पुलावर ब्रिटिश सत्तेविरोधात झालेल्या आंदोलनात रायगड जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी सहभाग घेतला. चौक गावचे स्व. विश्वनाथ रामचंद्र ठाकरे यांनीही या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता.
ब्रिटिश सरकारने त्यांना अटक करून कारावासात ठेवले. माफी मागण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात आला; मात्र देशाच्या स्वातंत्र्याच्या ध्येयाशी निष्ठावान असलेल्या विश्वनाथ ठाकरे यांनी माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे त्यांना कारावासाची शिक्षा भोगावी लागली.
स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, संघर्ष आणि बलिदानामुळेच भारताच्या स्वातंत्र्याचा मार्ग प्रशस्त झाला. अशा स्थानिक स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची नोंद घेऊन त्यांच्या स्मृती जपणे ही पुढील पिढ्यांना इतिहासाची ओळख करून देणारी महत्त्वाची बाब आहे.
स्व. विश्वनाथ रामचंद्र ठाकरे यांच्या नावाने रस्त्याचे नामकरण करून ग्रामपंचायत चौकने त्यांच्या शौर्याला, देशभक्तीला आणि देशसेवेला दिलेली आदरांजली निश्चितच कौतुकास्पद आहे. या नामकरणामुळे चौकच्या इतिहासातील एका महत्त्वपूर्ण अध्यायाची आठवण कायमस्वरूपी जपली जाणार असून, नव्या पिढीला स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा मिळणार आहे.




