ताज्या बातम्या

शिवसमर्थ मल्टीस्टेटचा 20 वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न; भव्य रक्तदान व मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद

तळमावले : सहकार क्षेत्रात आपल्या उत्कृष्ट आणि विश्वासू सेवेने अल्पावधीतच ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘शिवसमर्थ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड’च्या मुख्य कार्यालय व तळमावले शाखेचा वर्धापन दिन सोहळा शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी अत्यंत दिमाखात आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. केवळ व्यावसायिक प्रगती न साधता सामाजिक बांधिलकी जपण्याच्या संस्थेच्या परंपरेनुसार, यंदाचा वर्धापन दिन सोहळा विविध सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून सकाळी ‘शिवसमर्थ भवन’ या मुख्य कार्यालयाच्या इमारतीत मंगलमयी वातावरणात श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. विधिवत पूजा अर्चा झाल्यानंतर आरती करण्यात आली. या प्रसंगी तळमावले परिसर आणि तालुक्यातील असंख्य सभासद, ठेवीदार, ग्राहक आणि हितचिंतकांनी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी उपस्थित नागरिकांनी संस्थेच्या प्रगतीला भरभरून शुभेच्छा दिल्या.
वर्धापन दिनाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे संस्थेने आयोजित केलेले भव्य रक्तदान शिबिर. ‘बालाजी ब्लड सेंटर, सातारा’ यांच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. सध्या रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन संस्थेने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक झाले. परिसरातील अनेक सुजाण नागरिक, तरुण आणि संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःहून पुढे येत मोठ्या संख्येने रक्तदान केले. रक्तदात्यांना संस्थेच्या वतीने सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच त्यांना आकर्षण भेटवस्तू देण्यात आल्या.
ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी ‘शिव आरोग्य सेवा मल्टीस्पेशालिटी को-ऑपरेटिव्ह हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर लि.’ संचलित ‘शिव आरोग्य सेवा हॉस्पिटल, तळमावले’ यांच्या माध्यमातून मोफत सर्वरोग आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १०.०० वाजल्यापासून ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत हे शिबिर सुरू होते. या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने शेकडो रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना औषधोपचार आणि आरोग्याविषयी मोफत सल्ला दिला. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांसाठी हे शिबिर अत्यंत फायदेशीर ठरले.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या तळमावळे शाखेमध्ये दिनांक १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२६ या एक महिन्याच्या विशेष मुदतीमध्ये संस्थेत ठेवण्यात येणाऱ्या सर्व मुदत ठेवींवर (FD) नेहमीपेक्षा १ टक्का ज्यादा व्याजदर दिला जाणार आहे. नागरिकांनी या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
संपूर्ण सोहळा आणि विविध सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष ॲड. जनार्दन लक्ष्मण बोत्रे साहेब, संस्थेचे सीईओ श्री हेमंत तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ, सल्लागार, अधिकारी आणि कर्मचारी प्रतिनिधी यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. परिसरातील सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शिवसमर्थ भवन येथे प्रत्यक्ष भेट देऊन संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Scroll to Top