मुंबई : राष्ट्रीय चर्मकार महासंघ महाराष्ट्रीय चर्मकार संघ (रजि. क्र. महा/४०४२) या अराजकीय सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी सूर्यकांत लाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष डॉ. शांताराम पां. कारंडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
समाजासाठी सातत्याने काम करण्याची तळमळ, समाजाविषयी असलेली श्रद्धा आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या ध्येयधोरणांशी असलेली बांधिलकी लक्षात घेऊन लाडे यांची अस्थायी स्वरूपात महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन, कोणतेही वाद-विवाद किंवा गटबाजी न करता समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी काम करावे, अशी अपेक्षा नियुक्तीपत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.
सूर्यकांत लाडे हे शिवसेना अपंग सहाय्य सेनेचे अध्यक्ष असून पत्रकारांचे मित्र म्हणूनही त्यांची विशेष ओळख आहे. माजी मुख्यमंत्री व माजी लोकसभा अध्यक्ष डॉ. मनोहर जोशी यांच्या प्रसिद्धी माध्यमाशी संबंधित जबाबदारी त्यांनी प्रभावीपणे सांभाळली होती. पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्राशी त्यांचा सातत्याने जवळचा संबंध राहिला आहे.
समाजातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी तसेच गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी लाडे यांचे सामाजिक कार्य सुरू असते. त्यांच्या नियुक्तीमुळे समाजाच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडली जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
सूर्यकांत लाडे यांच्या नियुक्तीबद्दल सामाजिक, राजकीय, पत्रकारिता आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.




