ताज्या बातम्या

घोगावच्या जिल्हा परिषद शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत दमदार कामगिरी; दोन विद्यार्थ्यांची राज्य गुणवत्ता यादीत, तर नऊ विद्यार्थ्यांची जिल्हा गुणवत्ता यादीत निवड

कराड : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घोगाव येथील विद्यार्थ्यांनी इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षा सन २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत तब्बल ११ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असून, त्यापैकी दोन विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत, तर नऊ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.
राज्य गुणवत्ता यादीत झानेश्वरी तुषार डुंबरे आणि आदिराज संदीप भावके यांनी स्थान मिळविले. तर सार्थक प्रवीण पाटील, आदिती कुलदीप शिनगारे, विभावरी भूषण आमने, सिद्धा अरुण माने, प्रियंश प्रशांत थावरे, राजवंश सागर शिंदे, स्वराली संतोष करांडे, अंशुमन सागर पाटील आणि श्रीष्टी गोरखनाथ सूर्यवंशी यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.
या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य तसेच शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. विशेषतः विद्यार्थ्यांना योग्य दिशा, प्रेरणा आणि सातत्याने प्रोत्साहन देणाऱ्या मार्गदर्शक सौ. सविता सचिन राजमाने मॅडम यांच्या अथक परिश्रमाचे हे यश खऱ्या अर्थाने चीज झाले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
या यशाबद्दल सरपंच व सर्व सदस्य, ग्रामपंचायत घोगाव; अध्यक्ष व सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती घोगाव; मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोगाव; तसेच सर्व पालक व ग्रामस्थ घोगाव, ता. कराड, जि. सातारा यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
घोगावच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे गावाच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Scroll to Top