सातारा(अजित जगताप) : सातारा शहरानजीक असलेल्या खेड ग्रामपंचायतीने नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा. यासाठी खेड ग्रामपंचायत मध्ये बसवण्यात आलेल्या आर ओ यंत्रणेची चौकशी करा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे कार्याध्यक्ष राजेंद्र ओव्हाळ यांनी केली आहे.
सातारा शहरनजिक असलेल्या खेड ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये सत्ता कुणाची असली तरी भ्रष्टाचाराचा आरोप कधी चुकलेला नाही. मोठ्या प्रमाणात वाढत्या नागरिकीकरणामुळे भ्रष्टाचाराचे कुराण म्हणून खेड ग्रामपंचायतकडे पाहिले जाते. कधी आवास योजनेत तर कधी अंतर्गत गटारामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या ठिकाणी सातत्याने आरोप प्रत्यारोप होत असतात. त्याला खतपाणी घालण्याचे काम ग्रामपंचायत मार्फत होत आहे. आता शुद्ध पाणी पिण्यास मिळत नसले तरी याबाबत साधी चौकशी करण्याचे सौजन्य खेड ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या लोकप्रतिनिधींना करता येत नाही. हेच दुर्दैव आहे. आमदार शिवसेनेचे पण काम करतात भाजपचे.. जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे पण काम करतात भाजपचे. अशावेळी ग्रामविकास मंत्री भाजपचे असल्याने फारशी चौकशी किंवा कारवाई होणार नाही. म्हणूनच या ठिकाणी ग्रामपंचायतीमार्फत अनेक नागरी सुविधा असूनही उपाययोजना होत नाही. हेच सिद्ध झाले आहे.
खेड ग्रामपंचायत हद्दीत पाच ठिकाणी आर. ओ. पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसवून कार्यान्वित केली होती. काही दिवस शुद्ध पाणी पुरवठा झाल्यानंतर सुमारे पंधरा लाख रुपये खर्च करून आर. ओ. (पाणी शुद्धीकरण करणारी )यंत्रणा अचानकपणाने बंद पडली होती. त्यामुळे ग्रामविकास मंत्र्यांच्या जिल्ह्यात आर . ओ यंत्रणा बसूनही स्वच्छ पाणी पुरवठा खंडित झाला आहे. याबाबत चौकशी करून कारवाई करावी. यासाठी खेड ग्रामपंचायत मधील रहिवाशांनी सातारा जिल्हा परिषद, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) व सातारा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिनांक ७ जुलै २०२६ रोजी लेखी तक्रार दिली होती.
या लेखी तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे अखेर रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी श्री राजेश वसंत ओव्हाळ यांनी स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट २०२६ रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने खळबळ माजली आहे. दरम्यान, खेड ग्रामपंचायत मध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याने अनेक नागरिक आजारी पडत आहेत. याबाबत केलेल्या तक्रारीची जिल्हा व तालुका प्रशासन तसेच खेड ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळेच कार्यकर्त्यांना आत्मदहन करण्याचा इशारा द्यावा लागत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनाच्या प्रति संबंधित विभागाला देण्यात आलेले आहेत.




