मुंबई(शांताराम गुडेकर / समीर खाडिलकर) : शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, कोटक महिंद्रा बँकेतील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या नियमानुसार वेतनवाढ लागू करण्यात आली आहे. जुलै २०२६च्या वेतनात ही वाढ देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही वेतनवाढ मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे चिटणीस तातू नाईक यांनी सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न केल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तब्बल १२ वर्षांनंतर वेतनवाढीचा लाभ मिळाल्याचा दावा कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला.
या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी ८ ऑगस्ट २०२६ रोजी बाळासाहेब भवन येथे राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कोटक महिंद्रा बँकेतील कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष केला.
यावेळी बोलताना चिटणीस तातू नाईक यांनी बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून काम करत असून, कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने लढा दिल्याचे सांगितले. या लढ्याला मिळालेले हे यश असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, अशोक सूर्यवंशी आणि रवींद्र जाधव यांनी कोटक महिंद्रा बँकेत गेल्या १५ वर्षांपासून काम करत असल्याचा अनुभव सांगत, कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांविषयी मनोगत व्यक्त केले.
थकीत भत्ता, डीए वाढ आणि आरोग्य विम्याचे आश्वासन
आमदार किरण पावसकर यांनी आपल्या भाषणात कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसोबतच नोव्हेंबर २०२५पासूनचा थकीत भत्ता लवकरच मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. तसेच दरवर्षी डी.ए. वाढ, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी आरोग्य विमा आणि इतर सुविधांसाठी राष्ट्रीय कर्मचारी सेना प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
कोटक महिंद्रा बँकेतील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या नियमानुसार वेतनवाढ मिळाली आहे, त्याच धर्तीवर इतर बँकांमधील कर्मचाऱ्यांनाही या नियमाचा लाभ मिळवून देण्यासाठी संघटना प्रयत्न करणार असल्याचे पावसकर यांनी सांगितले.
तसेच ॲक्सिस बँकेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसंदर्भातील प्रकरण उच्च न्यायालयात सुरू असून, या प्रकरणातही कर्मचाऱ्यांच्या हितासाठी पाठपुरावा करून हजारो कर्मचाऱ्यांना वेतनवाढ व थकीत रकमेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय कर्मचारी सेना ही केवळ कर्मचाऱ्यांच्या वेतन व सेवा-सुविधांसाठीच नव्हे, तर कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्थैर्य व सुरक्षितता मिळवून देण्यासाठी काम करणार असल्याचे पावसकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार मानले.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे चिटणीस तातू नाईक, कोअर कमिटी सदस्य सचिन लिमन, अमर पाचागणे, प्रशांत सावंत, विठ्ठल पवार, अशोक सूर्यवंशी, रवींद्र जाधव, मिलिंद लाडे, प्रशांत मगर, शामराव पवार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.




