सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून, जिल्हाभरातून तब्बल २,०११ ठराव प्राप्त झाल्याने निवडणुकीचे राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, केंद्राच्या सुधारित बँकिंग नियमन कायद्यानुसार सलग १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ संचालक राहिलेल्या व्यक्तींना यावेळी निवडणूक लढविता येणार नसल्याने अनेक दिग्गज नेत्यांना ‘नो एन्ट्री’ मिळाली आहे.
यामध्ये विद्यमान अध्यक्ष तथा खासदार नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, आमदार रामराजे नाईक-निंबाळकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह एकूण १० संचालक अपात्र ठरले आहेत. त्यामुळे या नेत्यांच्या जागी कुटुंबातील सदस्यांना संधी दिली जाणार की निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दिग्गज नेते स्वतः निवडणुकीच्या रिंगणात नसले तरी त्यांनी आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री मकरंद पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई यांची भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याचे मानले जात आहे.
यावेळी जिल्हा बँकेची निवडणूक ही आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने तिचे राजकीय महत्त्व अधिक वाढले आहे. भाजपने जिल्हा बँकेवर स्वबळावर सत्ता मिळविण्याची तयारी सुरू केली असून, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) यांची भूमिका काय राहणार, याबाबतही उत्सुकता आहे.
दरम्यान, सध्या संचालक नसल्यामुळे मंत्री शंभूराज देसाई, मंत्री जयकुमार गोरे, आमदार अतुल भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि आमदार महेश शिंदे यांना निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा आहे. तसेच राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचा केवळ एकच कार्यकाळ पूर्ण झाल्याने तेही पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात.
नव्या नियमानुसार सलग १० वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या संचालकांना तीन वर्षांचा ‘कूलिंग पिरियड’ पूर्ण केल्यानंतरच पुन्हा निवडणूक लढविता येणार आहे. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे भोसले, उदयनराजे भोसले, रामराजे नाईक-निंबाळकर, नितीन पाटील, अनिल देसाई, प्रभाकर घार्गे, राजेंद्र राजपुरे, दत्तानाना ढमाळ, कांचन साळुंखे आणि प्रदीप विधाते हे दहा नेते यावेळी कोणाला उमेदवारी देतात, याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे.
महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष जिल्हा परिषद निवडणुकीप्रमाणेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही अनेक ठिकाणी एकमेकांविरुद्ध उभे ठाकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता साताऱ्यातील आगामी राजकीय समीकरणांची रंगीत तालीम ठरणार असल्याचे मानले जात आहे.
फलटण-पाटण वगळता राष्ट्रवादी-भाजपमध्ये थेट लढतीची शक्यता
जिल्हा बँकेवर सत्ता मिळविण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली असून, ठराव प्रक्रियेतही त्याचे प्रतिबिंब दिसून आले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अनेक भागांत मजबूत असल्याने दोन्ही पक्षांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे. फलटण आणि पाटण तालुके वगळता बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी-भाजप संघर्ष रंगण्याची चिन्हे आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीचा पर्याय पुढे येणार की तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.




