ताज्या बातम्या

मराठी साहित्यिकेची हिंदीत दमदार एंट्री; ‘उधार का उजाला’ चे उत्साहात प्रकाशन

मुंबई : मराठी साहित्यविश्वात आपल्या लेखणीची वेगळी ओळख निर्माण केलेल्या कवयित्री प्रज्ञा जांभेकर यांनी हिंदी साहित्यविश्वातही दमदार पाऊल टाकले. सदामंगल पब्लिकेशन प्रकाशित आणि प्रज्ञा जांभेकर लिखित उधार का उजाला’ या हिंदी कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या मिनी थिएटरमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि साहित्यिक विनय हर्डीकर होते. ज्येष्ठ कवी व अभिनेते किशोर कदम तसेच महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव, ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉ. किरण कुलकर्णीआणि महाराष्ट्राचे पहिले भारत श्री विजू पेणकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते उधार का उजाला’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी बोलताना विनय हर्डीकर यांनी हिंदी भाषेतील स्वतंत्र निर्मिती बद्दल प्रज्ञा जांभेकर यांचे कौतुक केले. त्यांच्या या लेखन शैलीत त्यांनी नव्या वाटा चोखंदळल्याचाही हर्डीकर यांनी विशेष उल्लेख केला.

किरण कुलकर्णी यांनी प्रज्ञा जांभेकर यांनी कविता लिहीतानाच्या त्यांच्या शैलीला अवतीभवती घडणाऱ्या घटनांचे अधिष्ठान असल्याने त्या अधिक भावस्पर्शी झाल्या आहेत, अधिक हृदयस्पर्शी असल्याचे सांगितले.

किशोर कदम म्हणाले, मराठी भाषेवर प्रभुत्व असलेली साहित्यिक हिंदी साहित्यक्षेत्रात पदार्पण करत आहे, ही अत्यंत महत्त्वाची आणि स्वागतार्ह बाब आहे. भाषांच्या सीमा ओलांडत साहित्य अधिक समृद्ध करण्याची क्षमता अशा प्रयत्नांतून दिसून येते.”

प्रज्ञा जांभेकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शालेय जीवनापासूनच मला हिंदी साहित्याची विशेष आवड होती. त्या आवडीचेच हे फळ असून, मनातील भावना आणि अनुभव कवितांच्या माध्यमातून हिंदी वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे.”

यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रज्ञा जांभेकर यांच्या कवितांमधील मानवी संवेदना, सामाजिक भान, स्त्रीमनाचे सूक्ष्म चित्रण आणि आशयघन लेखनशैलीचे विशेष कौतुक केले. हा कवितासंग्रह नव्या पिढीतील वाचकांसह हिंदी साहित्यविश्वातही स्वतंत्र ओळख निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रकाशनानिमित्त आयोजित विशेष काव्य-अभिवाचन कार्यक्रमालाही रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुनील कांबळे, राजेश शिरभाते आणि सानिका गोडसे यांनी कवितासंग्रहातील निवडक कवितांचे प्रभावी अभिवाचन करून उपस्थितांची मनं जिंकली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र हुंजे यांनी केले. साहित्यप्रेमी, कवी, लेखक, पत्रकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याला विशेष रंगत आली. कार्यक्रमाच्या शेवटी सदामंगल पब्लिकेशनचे प्रकाशक संदीप चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.

मेरा नाम तो चुरा लोगे,

पर वह रूहानी अहसास कहाँ से लाओगे?

दिए की लौ तो चुरा ली,

पर सूरज का तपता रुतबा कैसे पालोगे ?

कागज़ के पन्ने छीन लोगे,

पर मेरी रूह की स्याही कैसे उतारोगे?

भीड़ तो तुम्हारी होगी,

पर मेरे सन्नाटे की गूंज भला कैसे थामोगे?

प्रज्ञा जांभेकर

(कवियत्री)

Scroll to Top