ताज्या बातम्या

पनवेलच्या इतिहासात प्रथमच शासकीय स्तरावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती शासकीय स्तरावर मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित या भव्य कार्यक्रमाची संकल्पना सभागृह नेते अँड. प्रकाश बिनेदार यांनी मांडली होती. त्यांच्या प्रस्तावाला महापौर नितीन पाटील यांनी तत्काळ मान्यता दिली. तसेच आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार प्रशासनाने नियोजनबद्ध तयारी करून हा ऐतिहासिक उपक्रम यशस्वीरीत्या साकारला.
कार्यक्रमात राष्ट्रीय स्तरावरील कलाकारांनी पोवाडे, शाहिरी, गीत आणि नाट्यरूप सादरीकरणातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचा प्रभावी वेध घेतला. त्यांच्या साहित्यसंपदेचा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदानाचा, कामगार चळवळीतील सहभागाचा आणि सामाजिक परिवर्तनासाठी दिलेल्या संघर्षाचा प्रभावी उलगडा करण्यात आला. शाहिरी गीतांच्या तालावर उपस्थित नागरिक व अनुयायांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत जल्लोष केला.
महापौर नितीन पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “जयंती म्हणजे केवळ जन्मदिन साजरा करणे नव्हे, तर त्या महामानवांनी समाजाला दिलेल्या विचारांचा जागर करण्याचा दिवस आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांनी अत्यल्प औपचारिक शिक्षण असूनही आपल्या साहित्याच्या माध्यमातून जागतिक स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल केले. अशी व्यक्तिमत्त्वे समाजाला प्रेरणा देणारी असतात. पुढील काळात ही जयंती दरवर्षी अधिक व्यापक स्वरूपात साजरी करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
सभागृह नेते अँड. प्रकाश बिनेदार यांनी सांगितले की, समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्य वेचणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील, महानगरपालिका आयुक्त तसेच माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच शासकीय स्तरावर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यंदा प्रथमच कार्यक्रम आयोजित झाल्यामुळे त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचू शकली नाही, याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. पुढील काळात सर्व महामानवांच्या विचारांचा गौरव करणारे असे प्रेरणादायी कार्यक्रम अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, कलाकार, अधिकारी, समाजबांधव आणि उपस्थितांचे त्यांनी आभार मानले.
यावेळी विविध समाजबांधवांनी मनोगत व्यक्त करत मातंग समाजाच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी सकारात्मक भूमिका बजावत असल्याचे सांगितले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा तसेच महापौर नितीन पाटील यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. सभागृह नेते अँड. प्रकाश बिनेदार यांनी समाजाच्या अनेक वर्षांच्या भावनेचा आदर करून अण्णाभाऊ साठे जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्यासाठी घेतलेला पुढाकार समाजाभिमुख आणि प्रेरणादायी असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमास महापौर नितीन पाटील, सभागृह नेते अँड. प्रकाश बिनेदार, अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे, नगरसेवक मनोज भुजबळ, नगरसेवक अजय बहिरा, नगरसेविका प्रिती जॉर्ज, उपायुक्त कैलास गावडे तसेच विविध मान्यवर, अधिकारी, कलाकार आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने उपस्थित मान्यवर, कलाकार आणि समाजातील ज्येष्ठ व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. तसेच सर्व उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.

Scroll to Top