मुंबई – संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून बळ देणारे, वंचित-शोषितांच्या वेदनांना शब्द देणारे लोकशाहिर आणि थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या आज १०६ व्या जयंतीनिमित्त राज्यभरातून त्यांना अभिवादन करण्यात आले. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून त्यांच्या जयंतीनिमित्त कोणताही विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात न आल्याने साहित्य, लोककला आणि सांस्कृतिक क्षेत्रात नाराजी व्यक्त होत आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे. त्यांच्या साहित्याने आणि शाहिरीने समाजातील उपेक्षित, कष्टकरी आणि सर्वसामान्य माणसाला आवाज दिला. अशा महान साहित्यिकाच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय किंवा पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने व्याख्यानमाला, शाहिरी, लोककला सादरीकरण अथवा अभिवादनपर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित होणे अपेक्षित होते. मात्र, तसे कोणतेही उपक्रम न झाल्याने अनेक कलावंत आणि साहित्यप्रेमींनी खंत व्यक्त केली आहे.
राज्याच्या सांस्कृतिक धोरणात लोककलांचा आणि लोककलावंतांचा गौरव करण्यावर भर दिला जात असताना, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या युगपुरुषाच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या विचारांचा आणि साहित्याचा जागर करण्याची जबाबदारी सांस्कृतिक कार्य विभागाने अधिक संवेदनशीलपणे पार पाडणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.
अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी शिल्पकार होते. त्यांच्या कार्याचा सन्मान केवळ जयंतीपुरता मर्यादित न राहता, त्यांच्या विचारांचे संवर्धन आणि लोककलांच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने नियमित उपक्रम राबविण्याची मागणीही सांस्कृतिक क्षेत्रातून होत आहे.




