नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण 2025-26’ अंतर्गत ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ या अभियानाच्या अनुषंगाने लोकसहभागावर भर देत स्वच्छताविषयक विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 115, सेक्टर 15, वाशी तसेच नमुंमपा शाळा, सेक्टर 20, नेरूळ गाव याठिकाणी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी ॲन्थोनी वेस्ट हॅन्डलिंग व परिसर सखी विकास संस्था यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना कचरा वर्गीकरणाबाबत माहिती देण्यात आली व वर्गीकरणाचे महत्व पटवून देण्यात आले. त्यासोबतच आरोग्याविषयी चांगल्या सवयी, पावसाळा कालावधीत आरोग्याच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी याविषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या घरी कचरा वर्गीकरण होत असल्याची काळजी घ्यावी तसेच इतरांनाही याबाबत माहिती देऊन त्याचे महत्व सांगून प्रोत्साहित करावे असे सांगण्यात आले.
त्याचप्रमाणे सध्या पंतप्रधान महोदयांच्या संकल्पनेतून पावसाळी पाण्याचे संचयन करणारे कॅच द रेन अभियान सर्वत्र सुरू असून त्याचीही माहिती देणारा उपक्रम घणसोली सेक्टर 7 येथे नमुंमपा शाळा क्रमांक 76, ऐरोली सेक्टर 7 येथील जमनाबाई जनार्दन मढवी शाळा त्याचप्रमाणे ऐरोली सेक्टर 17 येथील विसावा सोसायटी घणसोली जिजामातानगर मध्ये राबविण्यात आला. या अंतर्गत पिण्याचे पाणी वाया घालवू नका, त्याकरिता पर्याय म्हणून पावसाचे पाणी साठवा, घरावर पडणारे पावसाचे पाणी पाईपद्वारे साठवणूक टाकीत गोळा करा (रेन वॉटर हार्वेस्टिंग) तसेच वृक्षारोपण करा, कारण झाडे लावल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते अशी महत्वपूर्ण माहिती देण्यता आली.
नवी मुंबईच्या महापौर श्रीम. सुजाता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त श्री. सुनील पवार आणि वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे व घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या नियंत्रणाखाली, ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात असून त्यामध्ये नागरिक सहभागावर भर देण्यात येत आहे, तसेच नवी मुंबईचे भविष्य असणारे उद्याचे नागरिक अर्थात विद्यार्थी यांच्यावर स्वच्छता आणि जलबचतीचे संस्कार करण्यावर भर दिला जात आहे.




