ताज्या बातम्या

सातारा जिल्हा बँकेत महायुतीची वाटचाल एकला चलो रे दिशेने ….

सातारा(अजित जगताप) : सध्या बहुचर्चित असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अकरा तालुक्यातील सोसायटी मधील मतदार ठराव साम- दाम- दंड –भेद आणि छेद माध्यमातून घेतले जात आहे. या ठरावाची मुदत दिनांक ५ ऑगस्ट पर्यंत आहे. त्यामुळे आता सामाजिक व विकास कामांपेक्षा ठराव घेण्यामध्ये नेतेगण मंडळी स्वतःला धन्य मानत आहे. ठराव… ठराव किती ही केले तरी सातारा जिल्हा बँकेत महायुतीची वाटचाल एकला चलो रे च्या दिशेने सुरू झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
सातारा जिल्हा बँकेमध्ये सत्ताधारी महायुतीपेक्षा भारतीय जनता पक्षाला स्वबळावर सत्ता मिळवण्याचे स्वप्न पडू लागली आहे. परंतु,महायुती व भाजपमधीलच काही मंत्री व माजी मंत्री यांचे राजकीय वैर सहकार क्षेत्रातही घुमू लागले आहे. त्याचे पडसाद उमटले आहेत. कितीही वेळा सांगितले तरीही जिल्हा बँक ही कधीच राजकारण विरहित राहिलेली नाही. पण, यंदा अटीतटीची लढत होत असल्याने राजकारण विरहित पण गटबाजीचे राजकारण उघडपणाने सुरू झाले आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादीच्या अनुभवातून आता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार मनोज घोरपडे, आमदार महेश शिंदे, डॉक्टर अतुल भोसले, आमदार धैर्यशील कदम सत्ता मिळवण्यासाठी मोर्चा बांधणी करत आहेत. सहकार क्षेत्रातील नवीन नियमाप्रमाणे दहा वर्ष सलग संचालक असणाऱ्यांना मुदतवाढ देण्यासाठी याचिका दाखल केली होती परंतु मे 2026 रोजी नवीन आदेश व उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे काही संचालकांना अडचण राहिल्यामुळे सातारा जिल्हा सहकारी बँकेत आता मी पुन्हा येणार नसलो तरी माझी नातेवाईक येणार आहेत. असा अंदाज वर्तवण्यासाठी काही बिदागी बहादूरांची फौज उभी केली आहे.
आदरणीय व सहकार महर्षी साताराचे दोन्ही राजे, फलटणचे राजे, महाबळेश्वरचे राजपुरे, वाईचे दोन बंधू आणि दोन महिला, अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त जाती जमाती, मजूर सोसायटी, इतर मागासवर्गीय, पतसंस्था, खरेदी विक्री संघ, शेती फळे फुले प्रक्रिया, गृहनिर्माण आणि कर्मचारी व सहकार निबंध असे प्रत्येकी एक संचालक असे संख्याबळ ठरावांच्या आकडेवारीनुसार सध्या तरी आहे. त्यामुळे मातब्बर मंडळींच्याच नेतृत्वाखाली जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत यश मिळणार आहे. हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. हात दाखवून अवलक्षण करण्याची गरज नाही.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नेत्यांच्या आश्रयाखाली यापूर्वी संचालक झालेल्या अष्टप्रधान मंडळांना आता नारळ मिळणार आहे. त्यामुळे नवीन चेहरे कोण? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. बातमी मागील बातमी याचा जर विचार केला तर सध्या तरी माजी मंत्री बाळासाहेब पाटील, राजेंद्र तांबे,महिला वर्गामध्ये शारदादेवी सूर्याजीराव कदम ,ऋतुजा राजेश पाटील, स्मितादेवी शंभूराज देसाई, जयश्री रविंद्र कदम, तेजस्विनी घोरपडे, पूजा घार्गे तर संचालकांमध्ये जयकुमार गोरे, संजीवराजे नाईक निंबाळकर, अनिरुद्ध गाढवे, शंभूराजे देसाई, डॉ. रामचंद्र वांगडे, ज्ञानेश्वर रांजणे, माजी आमदार दीपक चव्हाण, चंद्रकांत जाधव,अरुण पवार, अशोक जाधव यांच्या नावाची नेत्यांच्या आशीर्वादाने नावे पुढे येत आहेत.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची धोरणात्मक निर्णयांमध्ये जिल्ह्यातील अनेक दिग्गज राजकीय आणि सहकार क्षेत्रातील नेत्यांचा समावेश आहे. एकमेका सहाय्य करू… अवघे धरू सुपंथ.. याची अनेकदा प्रचिती आली आहे. हे नेत्यांसाठी योग्य आहे. पण, स्थानिक पातळीवर पक्षीय राजकारण करताना कार्यकर्त्यांना संघर्ष केल्याशिवाय हाती काही येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. फक्त ठराव घेण्यासाठी लागणारी ताकद कार्यकर्त्यांनी स्वतः वापरायचे असते. त्यामध्ये स्वतः संचालक होण्याची अपेक्षा ठेवायची नसते. अन्यथा काहींचे ठेकेदारीतील आरक्षण काढून दुसऱ्याला दिले जाईल. याची त्यांना भीती वाटते.
सध्या ठराव मुळे होणारे संघर्ष स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब व स्वातंत्र्य सेनानी किसनवीर आभार यांच्या विचाराला उघडपणाने तिलांजली देणारे ठरलेले आहे. याबाबत कुणीही भाष्य करत नाही. कारण हे विचार आत्मसात जरी केले तरी त्याची अंमलबजावणी करणे फार कठीण आहे. हे नेत्यांना सुद्धा माहित आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण होऊ नये यासाठीच नेते जागृत असतात. हे जिल्हा बँकेत नक्कीच दिसून येणार आहे. सध्या तरी महायुतीमध्ये एकला चलो रे चा नारा देऊन पदरात काही पाडून घेण्याची वेळ आलेली आहे. एकदा का निवडणूक पार पडली की ज्या ठिकाणी बिनविरोध निवडून येथील ते निवांत राहतील तरी इतर सहकाऱ्यांना संचालक निवडणुकीत निवडून देण्यासाठी पुन्हा एकदा सहल …पळवा पळवी… आरोप प्रत्यारोप होतच राहणार आहे. हे झाले नाही तर मग जिल्हा बँक कसली? असे प्रतिप्रश्न केला जात आहे.

———————————————————

फोटो– सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्यालय (छाया -अजित जगताप ,सातारा)

Scroll to Top