ताज्या बातम्या

लोककला व लोककलावंतांच्या राज्यव्यापी सर्वेक्षणाबाबत सकारात्मक चर्चा; सांस्कृतिक मंत्र्यांचे अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन निर्णयाचे आश्वासन

मुंबई : राज्यातील सर्व लोककला प्रकार आणि लोककलावंतांची राज्यव्यापी जनगणना (सर्वेक्षण) करून त्यांना शासनमान्य अधिकृत ओळखपत्र देण्यात यावे, तसेच लोककला प्रकारांची प्रमाणित माहिती शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी, या प्रमुख मागण्यांवर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासोबत बुधवारी सकारात्मक चर्चा झाली. या विषयावर लवकरच सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन निर्णय करण्यात येईल, असे आश्वासन श्री. शेलार यांनी दिले

लोककलवंतांच्या विविध प्रश्नावर लोककला अकादमीचे विभागप्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, ज्येष्ठ पत्रकार व लोककलेचे अभ्यासक खंडूराज गायकवाड आणि लोककलेचे अभ्यासक डॉ. शिवाजी वाघमारे यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या सोबत प्रदीर्घ चर्चा केली.

महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर ६६ वर्षे उलटून गेली असली तरी राज्यातील लोककला प्रकार आणि लोककलावंतांची अधिकृत शासकीय नोंद उपलब्ध नसल्याने सांस्कृतिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, आर्थिक नियोजन आणि लोककलावंतांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांचे अचूक नियोजन करण्यात अडचणी येत असल्याचा मुद्दा शिष्टमंडळाने मांडला.

दि. १६ एप्रिल २०१५ च्या शासन निर्णयानुसार लोककला, लोकनृत्य आणि लोकवाद्यांचे जतन, संकलन, दस्तऐवजीकरण व संगणकीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र, अपेक्षित उद्दिष्टे पूर्ण न झाल्याने हा उपक्रम नव्याने आणि अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

कोकणातील दशावतार लोककलेच्या सर्वेक्षणाचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगत, त्याच धर्तीवर राज्यातील सर्व लोककला प्रकार आणि लोककलावंतांचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संकेतस्थळावर लोककला प्रकारांची प्रमाणित यादी प्रसिद्ध करून सर्व लोककलावंतांना शासनमान्य ओळखपत्र देण्याचाही आग्रह धरण्यात आला.

या सर्वेक्षणामुळे राज्यातील लोककला प्रकारांची अधिकृत माहिती उपलब्ध होईल, सांस्कृतिक धोरण अधिक प्रभावीपणे राबविता येईल, संशोधक व विद्यार्थ्यांना प्रमाणित माहिती मिळेल आणि लोककलावंतांना शासनाच्या विविध योजना, मानधन, अनुदान व कल्याणकारी सुविधांचा लाभ अधिक सुलभपणे मिळू शकेल, असे खंडूराज गायकवाड यांनी बैठकीत सांगितले.

यापूर्वी जिल्हानिहाय सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने लोककला महोत्सव आयोजित केले जात होते. मात्र, हे महोत्सव बंद झाल्याने स्थानिक लोककलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे हे महोत्सव तातडीने पुन्हा सुरू करावेत, अशी मागणी प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी केली. याबाबतही सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे मंत्री आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.

बैठकीत लोककलावंतांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरही सविस्तर चर्चा झाली. या सर्व विषयांवर लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आवश्यक उपाययोजनांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन श्री. शेलार यांनी शिष्टमंडळाला दिले.

Scroll to Top