मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात बुधवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन झाले. आपला वाढदिवस केवळ समाजपयोगी उपक्रमांद्वारे साजरा व्हावा याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कटाक्षाने लक्ष देतात, असे नमूद करीत श्री. नार्वेकर यांनी श्री. फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शेतकऱ्यांना कर्ज आणि वीज बिल माफी देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी होत आहे आणि लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असल्याचे श्री. नार्वेकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित असलेले आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी स्वत: रक्तदान केले. या प्रसंगी भाजपा प्रदेश कार्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे, प्रदेश कार्यालय सहसचिव भरत राऊत, सदाशिव चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी श्री. नार्वेकर यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहत त्यांनी राज्यासाठी केलेले कार्य अविस्मरणीय असल्याचे सांगितले.
आपला वाढदिवस पोस्टर, बॅनर्स लाऊन साजरा न करता केवळ समाजपयोगी उपक्रम साजरे व्हावेत या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभरात सर्वत्र रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे तसेच अन्य समाजपयोगी उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून भाजपा प्रदेश कार्यालयाद्वारेही भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. कार्यालयातील तसेच राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी त्यात सहभागी होत रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमातून समाजाप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली.




