सातारा (अजित जगताप) : सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग असलेल्या माण -खटाव विधानसभा मतदारसंघात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली विकास कामे होत आहेत. त्यामध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा मांडवे येथे शाळेच्या खोल्या बांधण्यात आल्या. परंतु, उद्घाघाटनापूर्वीच टक्केवारीच्या ओझ्याने या खोल्याच्या काही टक्का असलेल्या छताचे पोपडे बाहेर पडू लागले आहे. दरम्यान, टक्केवारीमुळे काही टक्के भाग कोसळणारच अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
याबाबत माहिती अशी की, राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या मांडवे येथे प्राथमिक शाळा असून ग्रामस्थांनी मंत्री महोदय जयकुमार गोरे यांच्याकडे सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नोकरी देण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्या पद्धतीने शालेय शिक्षण समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्यानंतर मंत्री महोदयाच्या कामवाटप समितीच्या शिफारशीनुसार एका नातेवाईक ठेकेदाराला हे काम देण्यात आले होते. या कामाच्या गुणवत्तेबाबत ग्रामस्थांनीही तोंडी सूचना केली होती. पण टक्केवारीनुसार जेवढा निधी खर्च करणे अपेक्षित आहे. तेवढाच खर्च करण्यात आला होता. आवश्यक निधी वापरला गेला नसल्याने ठेकेदाराचे उकळ पांढरे झाले पण, उजव्या बाजूच्या तीन खोल्यांमधील एका खोलीतील शाळेच्या खोल्याच्या पोपडे पारदर्शकतेचे दर्शन व्हावे म्हणून बाहेर पडले. आता याबाबत तातडीने दुरुस्त करण्याची सूचना केली असली तरी टक्केवारी घेताना त्याचा पहिला विचार केला पाहिजे होता. असा प्रति प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मांडवे प्राथमिक शाळेच्या खोल्याचे बांधकाम करताना मंत्री महोदयांच्या पत्नी सौ. सोनियाताई गोरे आणि स्थानिक भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने मोठ्या धुमधडाक्यात भूमिपूजन करण्यात आले होते. आता शाळेच्या छतावरील पोपडे बाहेर पडतात कोणीही त्या ठिकाणी फिरकले नाही. घोषणाबाजी व श्रेयवाद घेण्यासाठी सर्वजण सहभागी होतात पण, निकृष्ट दर्जाच्या काम निसर्गाने दाखवून दिल्यानंतर मात्र ना खाऊंगा.. ना खाने दुंगा.. असे म्हणणाऱ्या समर्थकांना आता अभी तो भाग जाऊंगा.. असंच म्हणण्याची पाळी त्यांच्यावर आल्याचे टीका होऊ लागलेले आहे.
———————————————
चौकट- खटाव तालुक्यामध्ये झालेल्या पावसामुळे छतावर पाणी साचले होते. छताचा सांडवा नजरचुकीने काढला नव्हता. त्यामुळे हे पाणी झिरपून छतातील खालचा भाग पोपडे निघाले. त्याची आता अधिकारी वर्गाने पाहणी करून तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या शाळेच्या छताचे काही भाग कोसळल्याने आता त्यामध्ये राजकारणाचा शिरकाव झाल्यामुळे किती काळ राजकारण झिरपेली हे सांगणे कठीण आहे.
फोटो- सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या कामाचा दर्जा दाखवणारे छायाचित्र




