ताज्या बातम्या

कार्यकर्ता ते राष्ट्रपुरुष अजित दादा…..

जेष्ठ पत्रकार अजित जगताप,सातारा यांच्या लेखणीतून….
महाराष्ट्राच्या मातीतून अनेक युगपुरुष राष्ट्रपुरुषांनी जन्म घेतला. सामाजिक जाणीव ठेवून प्रत्येक जाती धर्मातील लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतली. अशा युगपुरुषांपैकी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब आणि किसनवीर आबा यांना राजकारणातील आदर्श मानून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळताच त्या संधीचे ते सोने करतात. महाराष्ट्राच्या संपूर्ण पटलावर ज्यांनी जीवाला चटका लावून गेले. ते आदरणीय अजित दादा पवार यांच्या बारामती येथील विमान अपघाती जाण्याने आता एक पोकळी निर्माण झालेली आहे. ती कदापी भरून निघणार नाही. वास्तविक पाहता काही काळ प्रदीर्घ असला तरी दररोज त्यांची आठवण काढणारे कोट्यावधी लोक त्यांच्या तसबीराकडे पाहिले तरी अनेकांचे डोळे पाणवतात . ज्यांचा कधीही राजकारणाशी संबंध आलेला नाही. असे लोक सुद्धा दररोज हळहळत आहेत. राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांच्यावर अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप भाजप सह विरोधी पक्षाने केले. ७१ हजार कोटीचा जलसंपदा विभागातील कथित भ्रष्टाचार याबाबत देशाचे भाजप नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा जाहिरीत्या अजितदादा पवार यांच्यावर आरोप केले होते. परंतु, त्यानंतर त्यामध्ये काही तथ्य नव्हते. हा राजकीय जुमलेबाजीचा प्रकार होता. हे शेवटी काळाने सिद्ध करून दाखवले.
आदरणीय अजितदादा पवार म्हणजे खऱ्या अर्थाने सामान्य माणसांच्या न्यायासाठी झटणारा एक खमक्या चेहरा होता. एक घाव दोन तुकडे करणारे राजकारणी होते. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सातारा जिल्ह्यातील पत्रकार व सातारा वेध संपादक शैलेश धुमाळ, सातारा समाचारचे संपादक संजय कदम, प्रीतीसंगमचेसातारा जिल्हा प्रतिनिधी मनोज पवार व सत्य सह्याद्रीचे रेवन महाजन असे आम्ही जावळी व कोरेगाव तालुक्यातील पत्रकार आणि मित्रपरिवार मलबार हिल, मुंबई येथील देवगिरी या बंगल्यामध्ये सकाळी अजितदादांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. त्यावेळेला आमचे त्यांनी मनापासून स्वागत करून चहा नाश्त्याची व्यवस्था सुद्धा केली होती. प्रसन्न मुद्रा आणि विकास कामांसाठी लोकांच्या अडीअडचणी जाणून घेण्याची त्यांची छबी आजही डोळ्यासमोरून जात नाही.
माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून अधिस्वीकृती पत्रकार म्हणून सेवानिवृत्तीचे वेतन मिळावे. यासाठी मी त्यांच्याकडे लिखित स्वरूपातील निवेदन दिले होते. ते निवेदन हातात घेऊन त्यांनी तातडीने महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालक श्री . ब्रिजेश सिंह यांना मोबाईल द्वारे थेट निवेदन वाचून मला सहकार्य करण्याची सूचना केली होती. एका सामान्य पत्रकारासाठी त्यांनी दिलेला वेळ हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण होता. अनेकांची व्यक्तिगत कामे केली असतील. परंतु सामाजिक जाण असणारा नेता म्हणून अजित दादा पवार यांना कधी विसरता येत नाही. नवीन वास्तूच्या उद्घाघाटनाच्या वेळेला त्या वस्तूच्या ठिकाणी मारलेला रंग, बसवलेली फरशी आणि कडी कोयंडा याकडेही बारकाईने लक्ष देणारे ते खऱ्या अर्थाने विकास पुरुष होते. त्यांच्या निघून जाण्याने संपूर्ण महाराष्ट्राची हानी झालेली आहे.
दिनांक २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे त्यांचा जन्म झाला होता. आजोळी जन्म आणि कर्मभूमीत मृत्यू होणे. हे खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्यातील अधोरेखित करणारी घटना आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांचे पुतणे होते. त्यांचा विवाह उस्मानाबाद येथील प्रतिष्ठित अशा पाटील घराण्यातील सुनेत्रा पाटील -पवार यांच्याशी झाला. त्यांना पार्थ आणि जय हे दोन मुलगे आहेत. आज संपूर्ण पवार कुटुंबीय सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देत आहे. जे काय घडले ते दुःख मनातील गाभाऱ्यात कायमचे जतन करून ठेवले आहे. अजितदादा पवार यांची राजकीय कारकीर्द १९८२ पासून सुरू झालेली आहे. सहकारी साखर कारखान्याचे संचालक त्यानंतर १९९१ मध्ये ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार व बारामती विधानसभा मतदारसंघातील आमदार झाले. १९९१ मध्ये त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. नंतर शरद पवारांसाठी त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आणि ते राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले. बारामती विधानसभा मतदारसंघातून ते सलग ७ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. अजून काही वेळा ते निवडून येण्यास कोणती अडचण नव्हती. परंतु, नियतीच्या खेळामुळे त्यांना थांबावे लागले.
राष्ट्रीय काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, भाजप देवेंद्र फडणवीस, शिवसेना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या वेगवेगळ्या कार्यकाळांत एकूण ६ वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. २०२३ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ऐतिहासिक बंड केले. बहुतांश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदारांच्या पाठिंब्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांचा गट हाच मूळ ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ असल्याचे मान्य करून त्यांना घड्याळ हे चिन्ह दिले. त्याचेही अगोदर २०२२ ते २०२३ या काळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही जबाबदारी सांभाळली.कामाची पद्धत आणि प्रशासनातील बारकावे याबाबत पकड असल्यामुळे अजितदादा पवार यांच्या नावाचा दरारा होता. त्यांच्या कडक शिस्तीसाठी, स्पष्टवक्तेपणासाठी आणि जलद निर्णय घेण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जात होते. त्यांनी राज्याचे अर्थमंत्री, जलसंपदा (सिंचन), ऊर्जा आणि ग्रामीण विकास यांसारखी महत्त्वाची खाती दीर्घकाळ सांभाळली आणि ग्रामीण भागातील सहकारी क्षेत्राला मोठी ताकद दिली. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्र सरकारने जुलै २०२६ मध्ये त्यांचा समावेश राज्याच्या अधिकृत ‘राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या शासकीय जयंती’ यादीत केला आहे. त्यानुसार दरवर्षी २२ जुलै रोजी त्यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी केली जाणार आहे .
सातारा जिल्हा हा त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने बालेकिल्ला होता. त्यांच्या नावाचा वापर करून अनेकांनी आपल्या राजकीय जीवनामध्ये कायापालट करून दाखवला. आजही अजितदादा पवार यांच्या शिकवणीमुळे ज्यांनी काही यश मिळवले. आज ते पक्ष सोडून गेले तरी दादांच्या आठवणी सोडून जाऊ शकत नाहीत. अशा या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली….

– पत्रकार अजित जगताप, मु. पोस्ट सायगाव ता. जावळी जिल्हा सातारा.. ९९२२२४१२९९/९१५६१४०४९१

_____________________________

फोटो- उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची शेवटची आठवण व भेट

Scroll to Top