मुंबई (शांताराम गुडेकर ) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित “मायेची सावली – एक हात कर्तव्याचा” या सामाजिक परिवाराच्या वतीने पक्षप्रमुख मा.श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त भांडुप येथील वृद्धांची काळजी हेच आमचे ध्येय असे ब्रीद वाक्य घेऊन काम करणाऱ्या हेवन ओल्ड एज केयर सेंटर या आजी-आजोबा वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून ३८ वा समाजोपयोगी उपक्रम उत्साहात आणि सेवाभावाने संपन्न झाला.
या उपक्रमात वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना तांदूळ, गहू, डाळी, साखर, खाद्यतेल, साबण, बिस्किटे, फळे, तसेच बसण्यासाठी खुर्ची इतर आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.समाजातील गरजू घटकांप्रती असलेली आपली सामाजिक बांधिलकी जपत “मायेची सावली – एक हात कर्तव्याचा” परिवाराने पुन्हा एकदा सेवाभावाचा आदर्श समाजासमोर ठेवला.
कार्यक्रमास स्थानिक नगरसेविका सौ. दीपमालाताई बडे,शाखाप्रमुख श्री.दिलीप भामे तसेच महिला शाखा संघटिका सौ. योगिताताई घोसाळकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.त्यांनी या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक करून समाजहितासाठी कार्य करणाऱ्या “मायेची सावली” परिवारास शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. यशवंत विठ्ठल खोपकर, कोषाध्यक्ष श्री.दौलत बेल्हेकर,सरचिटणीस श्री.वसंत घडशी, तसेच विश्वनाथ जाधव, निर्मला आवटे,गीता सकपाळ,वैभव डोके, अनंत पवार,संतोष चांदे,प्रकाश कुष्टे, अर्णव खोपकर, यांच्यासह अनेक पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रम दरम्यान बोलताना संस्थापक अध्यक्ष श्री.यशवंत विठ्ठल खोपकर म्हणाले, “राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देत ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या विचाराने ‘मायेची सावली – एक हात कर्तव्याचा’ परिवार २७ जुलै २०२१ पासून सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे.आजचा ३८ वा उपक्रम हा त्याच सेवाभावी वाटचालीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. भविष्यातही गरजू, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि वंचित घटकांसाठी समाजसेवेचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहील.”शिवाय कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्ती, पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते व हितचिंतकांचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हा उपक्रम समाजात सेवा, संवेदना आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला.




