मुंबई : मुंबईतील पारंपरिक (कन्व्हेन्शनल नॉन-एटीसी) रस्ते वाहतूक सिग्नल यंत्रणा आणि फ्लॅशिंग बीकन (चमकणारे दिवे) सुरळीत व कार्यक्षम ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढील दोन वर्षांसाठी १९ कोटी १५ लाख ५५ हजार ५०९ रुपयांचा खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामांचा कालावधी १ सप्टेंबर २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२८ असा निश्चित करण्यात आला आहे.
महापालिकेच्या प्रस्तावानुसार, बेट (आयलंड) शहरातील कन्व्हेन्शनल नॉन-एटीसी रोड ट्रॅफिक सिग्नल सिस्टिम आणि फ्लॅशिंग बीकनच्या देखभालीसाठी ६ कोटी ३९ लाख ४० हजार २८२ रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पश्चिम उपनगरासाठी ६ कोटी ७३ लाख ५ हजार ३९९ रुपये, तर पूर्व उपनगरासाठी ६ कोटी ३ लाख ९ हजार ८२८ रुपये खर्च करण्यात येणार आहेत. अशा प्रकारे तिन्ही विभागांसाठी एकूण १९.१५ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.
या देखभाल कामांमध्ये वाहतूक सिग्नल नियंत्रक (कंट्रोलर) यंत्रणा, सिग्नल दिवे, विद्युत उपकरणे, केबलिंग तसेच फ्लॅशिंग बीकनची दुरुस्ती व नियमित देखभाल यांचा समावेश असेल. या कामांमुळे मुंबईतील सिग्नल यंत्रणा अधिक सक्षम व सुरळीत राहण्यास मदत होणार असून, वाहतूक व्यवस्थापन अधिक परिणामकारक होईल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.




