प्रतिनिधी : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जुलै २०२६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या काळात मोठ्या प्रमाणावर उन्मळून पडलेल्या वृक्षांच्या समस्येवर गांभीर्याने विचार करण्यासाठी आणि त्यावर ठोस उपाययोजना आखण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वृक्ष तज्ज्ञांसोबत विशेष बैठकीचे आयोजन महापालिका मुख्यालयात करण्यात आले होते. याप्रसंगी उद्यान विभागाच्या उप आयुक्त श्रीम. स्मिता काळे तसेच वृक्ष तज्ज्ञ श्री. श्रीकांत इंगळहळीकर, डॉ. चंद्रकांत साळुंखे, श्रीम. शर्वरी बर्वे, श्री. सारंग फळे आणि अॅर्बोरिस्ट (Arborist) श्री. वैभव राजे उपस्थित होते.
यावेळी जुलै २०२६ मधील अतिवृष्टीच्या काळात कोसळून पडलेल्या झाडांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीत शहरातील वृक्षसंपदा, या पावसाळ्यात झाडे पडण्याची शास्त्रीय कारणे आणि भविष्यात करायच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये खालील बाबी निर्दशनास आल्या.
* झाडे कोसळण्याची मुख्य कारणे (वृक्ष तज्ज्ञांचे विश्लेषण):-
या बैठकीमध्ये मान्सून कालावधीत झाडे पडण्याच्या कारणांवर सखोल शास्त्रीय चर्चा झाली. मुसळधार पाऊस आणि वेगवान वारा हे झाडे कारण आहेच, मात्र त्यासोबतच झाडे पडण्यासाठी विविध बाबी कारणीभूत असल्याचे समोर आले. यामध्ये –
(1) सिमेंट-काँक्रिटचा अतिवापर : रस्ते आणि गृहनिर्माण संस्थांच्या बांधकामादरम्यान झाडांच्या मुळांच्या वाढीसाठी पुरेशी जागा सोडली जात नाही. विविध सुख-सुविधांच्या (केबल, पाईपलाईन्स) कामांसाठी वारंवार केल्या जाणाऱ्या खोदकामामुळे झाडांची मुळे कापली जातात, ज्यामुळे त्यांची जमिनीवरील पकड सैल होते. याच कारणामुळे रस्त्यालगत आणि सोसायट्यांच्या आवारात ९०% पेक्षा जास्त झाडे कोसळतात. याउलट, गावठाण व झोपडपट्टी भागात काँक्रिटीकरण कमी असल्याने तिथे झाडे पडण्याचे प्रमाण नगण्य आहे.
(2) फोटो ट्रॉपिझम (असंतुलन) : इमारतींमुळे पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने झाडे प्रकाशाच्या शोधात रस्त्याच्या बाजूला झुकतात. यामुळे झाडाचे एका बाजूचे वजन वाढून नैसर्गिक असंतुलन निर्माण होते.
(3) चुकीची छाटणी (Improper Pruning): झाडांची शास्त्रीय पद्धतीने छाटणी न करता केवळ वरच्या किंवा एकाच बाजूने अनपेक्षितपणे छाटणी केल्यामुळे वादळात झाडांवर ताण वाढतो आणि ती पडतात. मुख्यत्वे हौसिंग सोसायटयामध्ये अशाप्रकारे छाटणी केल्याचे दिसून येते.
(4) पावसाचे पाणी व सैल माती : पहिल्या पावसात पाने ओली होऊन झाडाचे वजन वाढते. त्यातच मुळांच्या बाजूला पाणी साचल्याने (वॉटर लॉगिंग) माती सैल होते. नवी मुंबई शहर किनारपट्टी भागात असून जमिनीखाली पाणी पातळीवर असल्याने हा धोका अधिक जाणवतो.
(5) प्रजातींचे स्वरूप : फायकस प्रजातीची झाडे रस्त्यालगत लावणे सोयीचे ठरत नाही. तसेच गुलमोहर व सोनमोहर (पेल्टोफोरम) या झाडांचे लाकूड ठिसूळ असल्याने त्यांच्या फांद्या तुटण्याचे प्रमाण जास्त असते. याउलट नारळ व ताडाची झाडे वादळातही टिकून राहतात.
*भविष्यातील दिशा व करावयाच्या उपाययोजना :–
या समस्यांवर मात करण्यासाठी राष्ट्रीय हरित लवाद (NGT) आणि नगररचना (Urban Forestry) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार महापालिका पुढील पावले उचलण्याचे नियोजन करीत आहे :
(1) झाडाच्या वरच्या भागाचे व्यवस्थापन (Remedy above the roots): केवळ मुळांमध्ये उपाय न शोधता जमिनीच्या वर असणाऱ्या झाडाच्या भागाची योग्य काळजी घेतली जाईल. झाडाचा वरचा भाग (Crown) योग्य आकारात राखून उंची नियंत्रित केली जाईल, जेणेकरून वाऱ्याचा ताण संतुलित राहील.
(2) संतुलित छाटणी : झाडांचा केंद्रबिंदू संतुलित राहील अशा पद्धतीने तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच छाटणी केली जाईल.
(3) नवीन मानक कार्यप्रणाली (SOP): झाडांच्या छाटणीसाठी एक निश्चित ‘एसओपी’ (SOP) तयार केली जाईल. झाडे छाटणीची योग्य वेळ मान्सून सुरू होण्यापूर्वी म्हणजेच मार्च किंवा एप्रिल महिन्यात असेल. ऑक्टोबर महिन्यात छाटणी करणे पूर्णपणे टाळले जाईल.
(4) छायाचित्रीकरण व झुकलेल्या झाडांचे दस्तऐवजीकरण : झाडांच्या छाटणीपूर्वीचे आणि नंतरचे (Before & After)
फोटो काढणे बंधनकारक राहील. तसेच सद्यस्थितीत झुकलेल्या सर्व झाडांचे तातडीने फोटो काढून, केस-टू-केस (Case-to-Case) अभ्यास करून त्यावर पुढील निर्णय घेतले जातील.
(5) मूल्यांकन व डेटा संकलन : नुकत्याच पडलेल्या झाडांचे दृश्यमान मूल्यांकन (Visual Assessment) केले जाईल. त्या
झाडांची यापूर्वी कधी छाटणी झाली होती का, याचा गेल्या वर्षभराचा जुना डेटा गोळा करून तपासणी केली जाईल. तसेच गरज पडल्यास नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेऊन Risk Assessment केले जाईल.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वादळी वा-यासह झालेल्या मुसळधार पावसात मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील नवी मुंबईसह सर्वच महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे पडली. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई शहरातील झाडे पडण्यामागील कारणमिमांसा जाणून घेण्याच्या दृष्टीने या क्षेत्रातील दीर्घ अनुभव असणा-या तज्ज्ञ व्यक्तींसमवेत तत्परतेने बैठक आयोजित केली. या बैठकीत सांगोपांग सविस्तर चर्चा करण्यात आली आणि यावरील उपाययोजनांच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलण्याचे निश्चित करण्यात आले.




