ताज्या बातम्या

दादरच्या स्टार मॉलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा आक्रोश! विकासकाच्या मनमानीने २२ कुटुंबे व १३ दुकानदार हैराण; सहकार कायद्यालाच हरताळ?

मुंबई : मुंबईच्या मध्यवर्ती दादर येथील केळकर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरालगत असलेल्या प्रसिद्ध स्टार मॉल (स्टार मराठा वैभव को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी) मध्ये गंभीर गैरव्यवहार होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. २०१४ मध्ये सोसायटीची विधिवत नोंदणी झाल्यानंतरही संबंधित विकासक चंपकलाल वर्धन अँड कंपनी यांनी सहकार कायद्याला हरताळ फासत सोसायटीच्या कारभारात हस्तक्षेप सुरूच ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सोसायटीतील २२ कुटुंबे आणि १३ दुकानदार, त्यातील बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक, अनेक वर्षांपासून मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करत आहेत. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, सोसायटीच्या नावाने अधिकृत पावती देऊन मेंटेनन्स वसूल करण्याऐवजी विकासकाकडून एका मॅनेजरमार्फत थेट वैयक्तिक खात्यावर पैसे जमा करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. हे सहकार कायद्याच्या तरतुदींना विरोधात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
याशिवाय इमारतीतील लिफ्ट वारंवार बंद पडणे, ड्रेनेज लाईन तुंबणे, मूलभूत सुविधांची दुरवस्था यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
या कथित गैरव्यवहाराविरोधात रहिवासी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता, तक्रार नोंदवून घेण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे रहिवाशांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६(३) अंतर्गत न्यायालयात धाव घेतली आहे.
दरम्यान, सहकार विभागाने या सोसायटीवर प्रशासकाची नियुक्ती केली होती. मात्र काही दिवसांनंतर प्रशासकीय कारवाईही निष्प्रभ ठरल्याचा आरोप रहिवाशांनी केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
रहिवाशांनी मुख्यमंत्री, गृहनिर्माण विभाग, सहकार विभाग आणि नगरविकास विभागाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून दोषींवर कारवाई करावी व ज्येष्ठ नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.
“ही केवळ एका सोसायटीची समस्या नसून, सहकार कायद्याच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे प्रकरण आहे. जर नोंदणीकृत सोसायटीतही विकासकांची मनमानी सुरू राहणार असेल, तर सामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा?” असा संतप्त सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे.

Scroll to Top