ताज्या बातम्या

रंगभूमीचे सम्राट प्रशांत दामले यांचा ‘स्पंदन’कडून अनोखा सन्मान

तळमावले/वार्ताहर : सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांची ‘बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठान’च्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल डाकेवाडी (काळगाव, ता. पाटण) येथील ‘स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. संदीप डाकवे यांच्या वतीने त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रशांत दामले यांना ‘प्राईड ऑफ स्पंदन’ शब्द लिहिलेला पारंपरिक गमजा, ‘तात्या’ पुस्तक आणि साप्ताहिक ‘स्पंदन एक्सप्रेस’चा अंक देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याप्रसंगी चि. स्पंदन डाकवे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

डॉ. संदीप डाकवे यांनी यापूर्वीही प्रशांत दामले यांना विविध नाटकांच्या सेटवर जाऊन आपल्या अनोख्या कलाकृतींनी चकित केले आहे. यामध्ये २३ एप्रिल २०२२ रोजी कराड येथे ‘कसंतरी होतंय’ नाटकाच्या सेटवर रेखाचित्र, ६ जून २०२३ रोजी ‘अक्षरगणेश’, तर ५ जुलै २०२४ रोजी ‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान प्रशांत दामले यांनी आजवर भूमिका साकारलेल्या सर्व नाटकांच्या नावांचा वापर करून तयार केलेले एक वैशिष्ट्यपूर्ण ‘शब्दचित्र’ त्यांना भेट दिले होते.

आपल्या कलेला समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम बनवणाऱ्या डॉ. संदीप डाकवे यांनी आजवर विविध क्षेत्रांतील तब्बल १६ हजारांहून अधिक मान्यवरांना अशा नावीन्यपूर्ण भेटी देऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कलात्मक व सामाजिक बांधिलकीची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य शासनाने ७ वेळा, तर विविध नामांकित संस्थांनी ९० हून अधिक पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे. या सत्कारानंतर अभिनेते प्रशांत दामले यांनी डॉ. डाकवे यांच्या उपक्रमांचे कौतुक करत साप्ताहिक ‘स्पंदन एक्सप्रेस’ला व त्यांच्या भावी सामाजिक वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.

Scroll to Top