मुंबई(भीमराव धुळप) : भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ, नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित १४ वी राष्ट्रीय धम्म परिषद व राष्ट्रीय पुरस्कार सोहळा – २०२६ अंतर्गत प्रदान करण्यात येणारा ‘सर्वोत्कृष्ट पत्रकार राष्ट्रीय पुरस्कार २०२६’ साप्ताहिक मुंबई रिपोर्टरचे संपादक अरविंद कोंडिबा बनसोडे यांना जाहीर करण्यात आला आहे.
महासंघाच्या सल्लागार समितीने त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या कार्याची सखोल पडताळणी करून पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत ही निवड केली आहे. समाजहित, मानवता, सामाजिक समानता, संविधानिक मूल्ये आणि राष्ट्रनिर्मितीसाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना हा राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार ३१ जुलै २०२६ (शुक्रवार) रोजी पुणे पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे येथे आयोजित १४ व्या राष्ट्रीय धम्म परिषद व राष्ट्रीय पुरस्कार सोहळा – २०२६ या कार्यक्रमात दुपारी २.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत प्रदान करण्यात येणार आहे.
या निवडीबद्दल भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघाचे राष्ट्रीय आयोजक प्रा. डॉ. गोरख साठे यांनी अरविंद बनसोडे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक व पत्रकारितेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
अरविंद बनसोडे यांची या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी झालेली निवड ही पत्रकारिता क्षेत्रासाठी तसेच महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब मानली जात असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




