मुंबई : मुख्यमंत्री म्हणून श्री. देवेंद्र फडणवीस यांनी एकूण 2,430 दिवस या पदाची सूत्रे हाताळल्याने सर्वाधिक काळासाठी मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या नेतृत्वाच्या यादीत ते तिसऱ्या स्थानी विराजमान झाले आहेत. शरद पवार यांना पाठी टाकत ते या क्रमांकावर पोहोचले आहेत.
श्री. शरद पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून सहा वर्षे आणि 221 दिवसांचे म्हणजेच एकूण 2,412 दिवसांचे कामकाज हाताळले होते. 12 जुलै रोजी श्री. फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकूण सहा वर्षे सात महिन्यांचा कालावधी पूर्ण केला आहे. हा कालावधी एकूण 2,430 दिवसांचा होतो.
या निमित्ताने भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी फडणवीस यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. ‘हा आम्हा कार्यकर्त्यांसाठी अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. हा केवळ एका विक्रमाचा टप्पा नाही तर महाराष्ट्रहितासाठी आपली दूरदृष्टी, अविरत परिश्रम आणि विकासाभिमुख कार्यशैली या बळावर सुरु असणाऱ्या विक्रमी वाटचालीत आपण गाठलेला एक माईलस्टोन आहे. आपल्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात यशाची नवीन शिखरे गाठत असून आपल्या नेतृत्वाचा आलेख आणि परीघ निरंतर विस्तारत राहो’ अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांना सदिच्छा दिल्या. त्याचबरोबर अनेक केंद्रीय नेते, मंत्रीमंडळातील सहकारी आणि महायुतीतील मान्यवर नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.
श्री. फडणवीस यांनी यापूर्वीच वसंतदादा पाटील, पृथ्वीराज चव्हाण, मनोहर जोशी, शंकरराव चव्हाण यांना मागे टाकले होते. पुढील काही महिन्यात ते विलासराव देशमुख यांच्या 2,686 दिवसांचा कार्यकाळ मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचतील.
12 जुलै 2026 पर्यंतचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकूण कार्यकाळ
1) पहिला कार्यकाळ – 31 ऑक्टोबर 2014 – 12 नोव्हेंबर 2019 = 1,839 दिवस
2) दुसरा कार्यकाळ – 23 नोव्हेंबर 2019 – 28 नोव्हेंबर 2019 = 6 दिवस
3) तिसरा कार्यकाळ – 5 डिसेंबर 2024 – 12 जुलै 2026 = 585 दिवस




