मुंबई, दि. २९ : मुंबई महानगर प्रदेशाचा (एमएमआर) सर्वांगीण विकास साधण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार कटिबद्ध असून, परवडणारी घरे, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि अत्याधुनिक दळणवळण व्यवस्था उभारण्याचे काम येत्या काही वर्षांत प्रत्यक्षात दिसून येईल, असे प्रतिपादन शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.
माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून आणि एमएमआरडीएच्या सहकार्याने मुंबईतील हॉटेल सहारा स्टार येथे आयोजित ‘कन्स्ट्रक्शन टाईम्स एमएमआर @2047’ या परिषदेत ते बोलत होते. परिषदेत लोकप्रतिनिधी, वरिष्ठ सनदी अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी एमएमआरच्या भविष्यातील विकास आराखड्यावर सविस्तर चर्चा केली.
राऊंड टेबल चर्चेदरम्यान डॉ. शिंदे यांनी महायुती सरकारच्या विकास धोरणांवर प्रकाश टाकताना सांगितले की, समूह पुनर्विकासामध्ये केवळ घरे नव्हे तर दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यावर सरकारचा भर आहे. म्हाडा, एमएमआरडीए आणि एसआरए यांच्या समन्वयातून राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांमुळे संपूर्ण एमएमआरचा कायापालट होईल. मेट्रो, वॉटर टॅक्सी, पॉड टॅक्सी आणि आधुनिक रस्ते जाळ्यामुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगर प्रदेशाला जागतिक दर्जाचे स्वरूप देण्यासाठी विविध विकास प्रकल्प राबविले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
परिषदेचे उद्घाटन नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता यांच्या हस्ते झाले. विविध प्राधिकरणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि तज्ज्ञांनी पायाभूत सुविधा, शहरी नियोजन आणि पुनर्विकास या विषयांवर विचारमंथन केले. पायाभूत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करून परिषदेची सांगता करण्यात आली.
धारावी पुनर्विकास देशासाठी आदर्श ठरणार
धारावी पुनर्विकास प्रकल्प हा केवळ घरे उभारण्यापुरता मर्यादित नसून, दर्जेदार रस्ते, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि प्रशस्त मोकळ्या जागांसह आधुनिक नागरी सुविधा उपलब्ध करून देणारा देशातील दिशादर्शक प्रकल्प ठरेल, असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. या प्रकल्पामुळे आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचे आधुनिक नगररचनेत रूपांतर होईल, असेही त्यांनी सांगितले.
“एमएमआर @2047 ही परिषद म्हणजे केवळ चर्चा नव्हे, तर मुंबई महानगर प्रदेशाच्या भविष्यातील विकासाची दिशा ठरविणारा एक महत्त्वपूर्ण संवाद आहे. शासन, प्रशासन, तज्ज्ञ आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहभागातून एमएमआरला जागतिक दर्जाचे, सर्वसमावेशक आणि शाश्वत महानगर बनविण्याचा हा सामूहिक संकल्प आहे.”
— माजी खासदार राहुल शेवाळे




