ताज्या बातम्या

मुंबईतील 99 हजारांहून अधिक नोंदणीकृत फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्रांचे वितरण सुरू

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे नोंदणीकृत नगर पथविक्रेत्यांना (फेरीवाल्यांना) क्यूआर कोड आधारित ओळखपत्र वितरण मोहिमेचा शुभारंभ महापौर रितू तावडे यांच्या हस्ते करण्यात आला. महानगरपालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात विविध भागांतील सुमारे 100 फेरीवाल्यांना प्रातिनिधिक स्वरूपात ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी महापौर रितू तावडे म्हणाल्या की, मूळ मुंबईतील अधिकृत फेरीवाल्यांना व्यवसायासाठी स्थैर्य मिळावे आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर नियंत्रण आणावे, यासाठी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रक्रिया आता मार्गी लागली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि नगर पथविक्रेता अधिनियमांतर्गत राज्यातील 99,435 नोंदणीकृत फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्रे दिली जाणार आहेत.
महापौरांनी सांगितले की, फेरीवाला समितीच्या निवडणुकीनंतर न्यायप्रविष्ट कारणांमुळे मतमोजणी रखडली होती. महानगरपालिकेच्या प्रयत्नांनंतर न्यायालयाची परवानगी मिळाल्याने प्रक्रिया पूर्ण झाली आणि फेरीवाला समित्यांचा मार्ग मोकळा झाला.
पात्र फेरीवाल्यांना त्यांच्या हक्काचे संरक्षण मिळावे, कोणावरही अन्याय होऊ नये आणि अनधिकृत व्यवसायावर प्रभावी नियंत्रण ठेवता यावे, यासाठी महानगरपालिका पुढेही सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केले.

Scroll to Top