विशेष लेख (योगेश त्रिवेदी ) मुंबईभर आता मेट्रो रेल्वेचे जाळे पसरत आहे, पसरविण्यात येत आहे. असे असले तरी उपनगरी गाड्यांना (लोकल वाहतूक) पर्याय नाही. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक लाखो लोकांना दिलासा देणारी आहे. ही तमाम मुंबईच्या तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील लाख्खो प्रवाशांची जीवनवाहिनी आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते जनता पक्षाचे भिवंडीचे आमदार परशुराम टावरे यांनी १९७८ साली महाराष्ट्र विधानसभेच्या सभागृहात दिवा वसई मार्गावर लोकल वाहतूक सुरु करण्याची मागणी केली होती. शिवसेनेच्या इतिहासात पहिले केंद्रीय मंत्री म्हणून ज्यांचा उल्लेख करावा लागेल असे राजापूर चे तत्कालीन खासदार सुरेश प्रभू यांना नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षात आणून रेल्वे मंत्री बनविले होते तेंव्हा मी परशुराम टावरे यांनी केलेली मागणी पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस यांनी ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारली. नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देवेंद्रांच्या आग्रहावरुन त्यांच्या सरकारला पाठिंबा दिला. त्या शिवसेना भाजप युती सरकारला एक वर्ष पूर्ण झाले तेंव्हा २०१५ साली मी वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांची गुजरात समाचार तर्फे मुलाखत घेतांना बोरीवली ते कर्जत कसारा आणि विरार ते कर्जत कसारा अशी लोकल वाहतूक वसई दिवा मार्गे सुरु करण्याची मागणी केली. तत्पूर्वी मतदारसंघ पुनर्रचना होण्याआधी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात वसई पालघर हे दोन विधानसभा मतदारसंघ होते तर ठाणे लोकसभा मतदारसंघ सुद्धा मोठा होता. प्रा. रामभाऊ कापसे हे ठाण्याचे तर राम नाईक हे उत्तर मुंबईचे खासदार होते. योगायोगाने प्रा. रामभाऊ कापसे आणि राम नाईक या दोघांकडे दिवा वसई आणि वसई दिवा मार्गे लोकल वाहतूक सुरु करण्याचा आग्रह धरला. या आधी राम नाईक यांनी विरार डहाणू डिएमयू शटल सेवा सुरु केली होती. मध्ये इंजिन आणि आजूबाजूला दोन दोन डबे. रामभाऊ नाईक यांनी वसई दिवा डिएमयू शटल सेवा सुरु केली होती. हाच धागा पकडून मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले. त्यांनी सांगितले की, आपण मेट्रो सुरु करतोय. मी म्हणालो की वसई दिवा या मार्गावर रुळ आहेत, गुजरात मधून दक्षिणेकडे गाड्या धावतात. फक्त लोकल वाहतूक सुरु केली तर विरार ते दादर आणि दादर ते कल्याण हा द्राविडी प्राणायाम वाचेल. वेळ, पैसा आणि मेहनतीची बचत होऊ शकेल. दहा वर्षे झाली. नुकतीच बोरीवलीचे आमदार संजय उपाध्याय यांच्या बरोबर एका पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सविस्तर चर्चा केली आणि त्यांना हा मुद्दा समजावून सांगितला. त्यांना तो पटला. त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना सविस्तर निवेदन दिले आणि बोरीवली ते वसई दिवा मार्गे कल्याण लोकल वाहतूक सुरु करण्याची मागणी आग्रहपूर्वक मांडली. बोरीवली येथून कर्जत कसारा जर लोकल वाहतूक सुरु झाली तर कर्जतहून पुढे पुणे आणि तेथूनही प्रवासी पुढच्या प्रवासाला जाऊ शकतील. बोरीवली हून कसारा पर्यंत लोकल वाहतूक सुरु झाली तर पुढे नाशिक आणि त्याही पुढे प्रवासी जाऊ शकतील. टिटवाळा येथील महागणपती, डोंबिवली येथील खिडकाळेश्वर महादेव आणि अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर दर्शनासाठी भाविक सहजपणे लवकर जाऊ शकतील. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आमदार संजय उपाध्याय यांना निःसंदिग्ध ग्वाही दिली आणि वसई जवळच जूचंद येथे जंक्शन बनवून बोरीवली ते वसई दिवा मार्गे कल्याण उपनगरी वाहतूक लवकरच प्रत्यक्षात येईल, असे सुस्पष्ट केले. मेट्रोचे जाळे कितीही विणले तरी आजच्या घडीला कुलाबा ते मीरा भाईंदर, वसई, ठाणे अंबरनाथ बदलापूर वांगणी अशी थेट सेवा सुरु व्हायला बराच कालावधी लागेल. टप्प्या टप्प्याने प्रवास करावा लागतो. परंतु जो मार्ग अस्तित्वात आहे त्याचा म्हणजेच दिवा वसई आणि वसई दिवा अशी बोरीवली तसेच विरार ते कर्जत कसारा अशी लोकल वाहतूक सुरु होणे ही काळाची गरज आहे. यामुळे वेळ पैसा आणि मेहनत वाचेल. खऱ्या अर्थाने सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास प्रत्यक्षात येईल आणि विकसित भारत २०४७ चे स्वप्न पूर्णत्वास येऊ शकेल. संजय उपाध्याय आणि अश्विनी वैष्णव यांचे तसेच रेल्वेच्या तमाम घटकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा !
–

योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१. (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत).*




