सातारा(अजित जगताप) : सातारा शहरानजीक असलेल्या खेड ग्रामपंचायतीचे हद्दीतून सातारा- कोरेगाव रस्ता जात आहे. या रस्त्यावरच खुल्या कारागृहासारखा गर्दीच्या वेळी बाजार भरतो. आणि कचरा सुद्धा विसावा घेतो. आज शनिवार दिनांक २७ जून रोजी काहीजण कचरा उचलून चांगली स्वच्छता मोहीम केलेली आहे. पण कचरा टाकणारे मोकाट… उचलणारे काही कॅमेरा मध्ये दिवसभर चमकले. याची आता खेड परिसरात चर्चा सुरू झालेली आहे. सातारा- कोरेगाव रस्त्यावरील संगम नगर, विकास नगर , बॉम्बे रेस्टॉरंट आणि न्यू विकास नगर परिसर, क्षेत्र माहुली रस्त्याच्या दुतर्फी अनाधिकृत बांधकाम व टपऱ्यांचे साम्राज्य उभे राहिलेले आहे. ठेकेदारांची पंढरी असलेल्या या भागात बंगला तिथे ठेकेदार, झोपडी तेथे मजूर अशी अवस्था आहे. नागरी सुविधांचाही मोठा अभाव आहे. याबाबत ही नैतिकता म्हणून स्वच्छता होणे . गरीब व कारागीर आणि कष्टकरी समाजाला प्रतिष्ठा मिळणे गरजेचे आहे. आज या रस्त्यावर अनेक जण आपल्या उपजीविकेसाठी शेतमजूर व बिगारी तसेच इतर कामे करतात. भाजीपाला व फळ विक्रेता म्हणून प्रामाणिकपणाने सेवा करतात. त्यांचा प्रश्न सोडवणे अद्यापही कुणालाही जमले नाही. या परिसरातच राज्याचे वजनदार मंत्री, खासदार एवढेच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य व वरिष्ठ अधिकारी वर्ग राहतात. या रस्त्या वरून ये जा करताना ते नेहमीच रस्त्यालगतचे बकाल दृश्य बघतात. याबाबत ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी नागरी वस्ती वाढत असताना सुसज्ज मंडई होणे येथील नागरिकांचा अधिकार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला काहीजण नियमितपणाने खुलेआम कचरा टाकतात. त्यांच्यावर कधीही कारवाई झालेली नाही. सातारा- कोरेगाव रस्त्यावरील खेड ग्रामपंचायत हद्दीत कचरा टाकणारे मोकाट व कचरा उचलणारे एक दिवसासाठी चमकले. वास्तविक पाहता कचरा उचलण्याचे त्यांनी चांगले काम केले आहे. ही मोहीम त्यांनी दर महिन्याला राबवली तर खऱ्या अर्थाने स्वच्छता राखण्यास मदत होणार आहे. फक्त फोटोसेशन व व्हिडिओग्राफी करून फार तर दहा पंधरा लोकांसाठी रोजगार उपलब्ध होईल. मूळ समस्या सुटणार नाही. या परिसरात वैद्यकीय महाविद्यालय होत आहे. त्यामुळे हा परिसर आतापासूनच स्वच्छता ठेवण्यासाठी सज्ज झाला पाहिजे. याबाबत आता शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन ग्रामपंचायत मध्ये सुसज्ज मंडई उभारणीसाठी प्रयत्न करावा. कचरा रस्त्यावर कोणी टाकू नये अशी कायद्यात तरतूद आहे. त्याचा प्रशासनाने कडक वापर केला पाहिजे. यासाठी ग्रामपंचायत आणि बांधकाम व आरोग्य विभागानेच सक्षम यंत्रणा उभी करावी. कचरा उचलण्याचे काम हे त्या परिसरातील लोकसभागातून होणे अपेक्षित आहे. परंतु, स्थानिक लोकांच्या ऐवजी काहीजण त्या ठिकाणी राजेरोसपणाने बांधकामाचेही साहित्य रस्त्यावर टाकतात. शिळे खाद्यपदार्थ टाकल्यामुळे भटके जनावरे सुद्धा या परिसरात भटकत असतात. त्याचा स्थानिक नागरिकांना त्रास होतो. या साठीच आजूबाजूच्या परिसरातील कचरा उचलण्याची यंत्रणा अधिक सक्षम व्हावी. निवडणुकीच्या काळामध्ये दिलेली आश्वासनाची पूर्तता करणे. हे लोकप्रतिनिधीचे काम आहे. ही त्यांची जबाबदारी आहे. त्यासाठी मोठा गाजावाजा करण्याची आवश्यकता नाही. असे स्थानिक नागरिकांनी स्पष्ट पणाने सांगितले. थोर समाज सुधारक संत गाडगेबाबांनी कधीही प्रसार माध्यमाची यंत्रणा घेऊन स्वच्छता केली नव्हती .म्हणून प्रामाणिक स्वच्छता झालेली आहे. कोणी संत गाडगेबाबा होण्याची अथवा त्यांच्या जवळपास जाण्याची या काळात तर अपेक्षा नाही. जे सामाजिक काम केले जाईल त्यासाठी प्रसिद्धी माध्यम कशाला? असा खोचक सवाल स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान, ज्या लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला. त्यांना मात्र, मनापासून स्थानिक नागरिकांनी धन्यवाद दिले आहे. या मोहिमेच्या वेळी हजर असलेल्या काही युट्युब वाहिनीच्या प्रसार माध्यमाला ही कचरा उचलल्यास प्रवृत्त केले पाहिजे होते .त्यांनीही निश्चितच कचरा उचलण्यासाठी योगदान दिले असते. अशी आशा आहे. त्यांच्यातील ही सामाजिक कार्यकर्त्याला जागृत करावे. अशी मागणी होऊ लागलेली आहे.
फोटो – सातारा- कोरेगाव रस्त्यावरील स्वच्छता मोहीम यशस्वी.. (छाया- अजित जगताप, सातारा)




