ताज्या बातम्या

मालमत्ता कर भरण्यासाठी ३० जूनपर्यंत साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कॅश काऊंटर राहणार सुरू

नवी मुंबई :आर्थिक वर्ष २०२६-२७ चा मालमत्ता कर भरण्यासाठी ३० जून २०२६ पर्यंत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी तसेच शनिवार आणि रविवार या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीदेखील नवी मुंबई महापालिकेचे मुख्य कार्यालय तसेच शहरातील ८ विभाग कार्यालयांतील व त्या अंतर्गत असणारी इतर कर संकलन केंद्रे सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत.

नागरिकांना सुट्टीच्या दिवशी मालमत्ता कर भरता यावा, यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून १ जुलै २०२६ पासून थकीत करावर २ टक्के विलंब शुल्क लागू होणार आहे. त्यामुळे अतिरिक्त आर्थिक भार टाळण्यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या सुविधेचा लाभ घेत ३० जून २०२६ पूर्वी मालमत्ता कर भरावा, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेला दि. २६ जून रोजी मोहरम, दि. २७ जून रोजी शनिवार आणि २८ जून रोजी रविवार अशा सुट्ट्या आहेत. परंतु नागरिकांच्या सुविधेसाठी या सुट्ट्यांच्या दिवशीही कर संकलन केंद्रे सुरू ठेवण्यात येणार आहेत. नोकरदार वर्गास आणि सर्वसामान्य नागरिकांना या सुविधेमुळे सुट्टीच्या दिवशीही कर भरणे सुलभ होणार आहे. तसेच कामकाजाच्या दिवशी सर्व कर संकलन केंद्रे सकाळी १० ते संध्याकाळी ३ वाजेपर्यंत सुरू राहतील.

नवी मुंबई शहरातील मालमत्ताधारकांसाठी आठही विभाग कार्यालयांमधील कर संकलन केंद्रांत प्रत्यक्ष कर भरण्याची सुविधा उपलब्ध असून नागरिकांना घरबसल्या मालमत्ता कर भरण्यासाठी विविध ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय व्हॉट्सअॅप चॅटबॉट ( क्रमांक 8291920504), ‘My NMMC – माझी नवी मुंबई’ हे मोबाईल अॅप , महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट www.nmmc.gov.in आणि कर देयकांवरील QR Code स्कॅनिंग, तसेच विविध युपीआय अॅप्स यांच्या माध्यमातून कर भरण्याची सुविधा उपलब्ध असून याशिवाय डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, आरटीजीएस आणि एनईएफटी यांसारखे डिजिटल पेमेंट पर्यायही उपलब्ध आहेत.

नागरिकांच्या सोयीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेने ३० जून २०२६ पर्यंत शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही मालमत्ता कर संकलन केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मालमत्ता कर वेळेत भरणे ही प्रत्येक नागरिकाची कर्तव्य भावनेतून पार पाडायची जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व मालमत्ताधारकांनी ३० जून २०२६ पूर्वी आपला मालमत्ता कर भरून महापालिकेच्या विकास कामांमध्ये योगदान द्यावे. तसेच १ जुलै २०२६ पासून थकीत करावर २ टक्के विलंब शुल्क लागू होणार असल्याने अतिरिक्त आर्थिक भार टाळण्यासाठी नागरिकांनी उपलब्ध ऑनलाइन तसेच प्रत्यक्ष कर भरणा सुविधांचा लाभ घेऊन मुदतीपूर्वी कर भरणा करावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Scroll to Top