ताज्या बातम्या

वटपौर्णिमेनिमित्त ‘अथक प्रयत्न, सावित्री यज्ञ’ पुरस्काराचा शुभारंभ… ‘अभियान सन्मान’च्या ७८ व्या पुष्पाचे ३० जून रोजी आयोजन

मुंबई : ‘कलाश्रम’ संस्थेतर्फे स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कला केंद्राच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘अभियान सन्मान’ उपक्रमाच्या ७८ व्या पुष्पाचे आयोजन मंगळवार, ३० जून २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिराच्या चौथ्या मजल्यावरील मल्टीपर्पज दालनात करण्यात आले आहे. या कार्यक्रमास वृत्तनिवेदिका व लेखिका मंजिरी मराठे प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
‘अभियान सन्मान’ उपक्रमांतर्गत प्रत्येक महिन्यात त्या महिन्यात दिवंगत झालेल्या व्यक्तींचे स्मरण केले जाते तसेच त्यांच्या कार्याशी सुसंगत काम करणाऱ्या गुणी व्यक्तींचा सन्मान केला जातो. यंदा लेखक-निर्माते अण्णासाहेब देऊळगावकर, दिग्दर्शक कांचन नायक आणि आदर्श माता जयश्री थरवळ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लेखक-दिग्दर्शक दीपक कदम, खानावळ उद्योजिका सीमा जानकर आणि लेखक-दिग्दर्शक रमेश मोरे यांची ‘दखलपत्र’ सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे.
याशिवाय, गेल्या दहा महिन्यांपासून कर्तृत्ववान कामगारांच्या मुला-मुलींचा गौरव करणारा विशेष पुरस्कारही दिला जातो. यंदाचा २१ वा पुरस्कार कामगार कन्या, लेखिका आणि रंगभूषाकार शिवानी गोंडाळ यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार आदर्श श्रमिक पांडुरंग परब व आदर्श गृहिणी रुक्मिणी परब यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिला जात असून ज्येष्ठ रंगकर्मी अशोक परब यांचे या उपक्रमाला मार्गदर्शन लाभले आहे.
यंदापासून वटपौर्णिमेच्या निमित्ताने ‘अथक प्रयत्न, सावित्री यज्ञ’ या नव्या पुरस्काराची सुरुवात करण्यात येत आहे. आदर्श माता-पिता हरिश्चंद्र धुरी आणि तारामती धुरी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सत्तर वर्षांहून अधिक वयाच्या, कष्टमय जीवन जगत मोलमजुरी करून संसार सांभाळणाऱ्या महिलांचा या पुरस्कारासाठी गौरव केला जाणार आहे. या उपक्रमाला प्रकाशक व सामाजिक कार्यकर्ते शिवाजी धुरी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
कार्यक्रमातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या प्रज्ञावंतांना कलात्मक अभिवादन. लोकशाहीर निवृत्ती पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या गाजलेल्या ‘काठी नं घोंगड घेऊ द्या की रं’ या लोकगीतावर नृत्यांजली सादर करण्यात येणार आहे. नर्तक व नृत्यदिग्दर्शक चिराग गोरखे हे हे सादरीकरण करणार आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुरा लिमये करणार असून शुभांगी चव्हाण, किरण घरटकर, विजय पवार आणि छाया कोलगे हे ‘दखलपत्र’ वाचन करणार आहेत. तसेच सविता जाधव, प्रिया राजपुरकर आणि आर्या सावंत यांचाही सूत्रसंचालनात सहभाग असणार आहे.
पत्रकार नंदकुमार पाटील हे ‘कलाश्रम’ संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष असून नंदिनी पाटील या संस्थेच्या संचालिका आहेत. संस्थेच्या वतीने नागरिकांनी या प्रेरणादायी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Scroll to Top