ताज्या बातम्या

सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार; उंडाळे-येवती रस्त्यावरील खड्डे निकृष्ट पद्धतीने भरल्याचा आरोप

कराड(प्रताप भणगे) : कराड तालुक्यातील उंडाळे ते येवती या मार्गावरील रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीच्या कामावर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पावसाळ्यापूर्वी खड्डे भरण्याचे काम सुरू असले, तरी अनेक ठिकाणी हे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यावरील खड्डे व्यवस्थित साफ न करता तसेच मुरूम न काढताच त्यावर साहित्य टाकून भराव करण्यात आला आहे. काही ठिकाणी खड्डे अर्धवट भरलेले असून अनेक भागांमध्ये रस्ता पूर्ववत धोकादायक अवस्थेतच असल्याचे चित्र दिसून येत आहे. पावसाळा तोंडावर आलेला असताना देखील कामात हलगर्जीपणा होत असल्याने वाहनचालक आणि ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
“खड्डे भरल्याचे केवळ दिखाऊ काम करण्यात आले असून हे भराव किती दिवस टिकणार, हा मोठा प्रश्न आहे,” अशी प्रतिक्रिया काही ग्रामस्थांनी व्यक्त केली. पावसाच्या सुरुवातीलाच हे खड्डे पुन्हा उघड होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, संबंधित कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून दोषी ठेकेदार आणि संबंधितांवर कारवाई करावी, तसेच दर्जेदार दुरुस्तीचे काम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Scroll to Top