ताज्या बातम्या

मित्रांच्या भेटीतून समाजसेवेची वाट; उंडाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी उपक्रम

उंडाळे : गेट-टुगेदर म्हटले की मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी, जुन्या आठवणींना उजाळा आणि आनंदाचा सोहळा हे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. मात्र स्वा. दादासाहेब उंडाळकर विद्यालय, उंडाळे येथील इयत्ता दहावी (बॅच २००८-०९) च्या आपुलकी मित्रपरिवार या माजी विद्यार्थ्यांनी गेट-टुगेदरला सामाजिक बांधिलकीची अनोखी जोड देत एक स्तुत्य आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
या उपक्रमांतर्गत कोळे येथील जिजाऊ वसतिगृहातील ३५ अनाथ विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य, अन्नधान्य, दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तू, सॅनिटरी पॅड तसेच फळझाडांची रोपे भेट देण्यात आली. मित्रांच्या पुनर्मिलनाचा आनंद साजरा करताना समाजातील गरजू घटकांसाठी मदतीचा हात पुढे करण्याची संवेदनशीलता या उपक्रमातून दिसून आली.
“गेट-टुगेदर म्हणजे केवळ मनोरंजन किंवा आठवणींचा मेळावा नसून समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची संधी असू शकते,” हा संदेश या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून दिला. उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांची परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी जिजाऊ वसतिगृहाच्या संस्थापकांनी अनेक वर्षे अनाथ व गरजू मुलांसाठी केलेल्या कार्याचा विशेष गौरव करण्यात आला. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली असून समाजासाठी त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याची भावना व्यक्त करत माजी विद्यार्थ्यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
“समाजाने दिलेल्या संस्कारांची परतफेड समाजसेवेच्या माध्यमातून” या भावनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला असून, मित्रांच्या भेटीतून समाजसेवेची वाटचाल घडवणारा हा खरा गेट-टुगेदर असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Scroll to Top