ताज्या बातम्या

महाबळेश्वरच्या ‘वेस्ट फील्ड प्रॉडक्ट्स’ला दादर कोकण महोत्सवात उत्स्फूर्त प्रतिसाद; उद्योजिका शितल दानवले यांची यशोगाथा प्रेरणादायी

मुंबई : दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरातील महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड यांच्या दालनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘कोकण बाजार महोत्सवा’त महाबळेश्वर येथील ‘वेस्ट फील्ड प्रॉडक्ट्स’ या फूड प्रोसेसिंग कंपनीच्या उत्पादनांना ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हा महोत्सव १२, १३ आणि १४ जून २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
‘वेस्ट फील्ड प्रॉडक्ट्स’च्या संचालिका सौ. शितल दानवले यांनी ग्रामीण भागात राहून शेती आणि त्यास पूरक फूड प्रोसेसिंग उद्योग उभारला आहे. आपल्या कष्ट, जिद्द आणि दूरदृष्टीच्या बळावर त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे, सोशल मीडियावरील त्यांचा प्रभाव, जनसंपर्क कौशल्य आणि प्रभावी मार्केटिंगमुळे त्यांच्या उत्पादनांना दादर येथील कोकण महोत्सवात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
शितल दानवले या सोशल मीडियावर सातत्याने शेतकरी, शेतीविषयक प्रश्न, ग्रामीण भागातील समस्या, सामाजिक विषय तसेच महिलांच्या सक्षमीकरणाशी संबंधित मुद्द्यांवर प्रभावीपणे आवाज उठवत असतात. त्यामुळे त्यांचा मोठा फॉलोअर्स व सबस्क्राइबर वर्ग निर्माण झाला असून त्याचा लाभ त्यांच्या उद्योजकीय प्रवासालाही होत आहे.
शेती करत असतानाच फूड प्रोसेसिंग उद्योग यशस्वीपणे उभारून त्यांनी ग्रामीण भागातील महिला आणि शेतकरी कुटुंबातील युवक-युवतींसमोर आदर्श निर्माण केला आहे. “महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येऊन स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे,” असा संदेश त्या नेहमी देत असतात.
त्यांच्या कार्याची दखल घेत नुकताच प्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे यांच्या हस्ते त्यांना ‘सक्षम दुर्गा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच रोटरी क्लब, सातारा यांच्या वतीने त्यांना ‘व्होकेशनल अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला आहे.
यापूर्वी २०२५ मध्ये मुंबई येथील शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित प्रतिभाशाली कलावंत मेळाव्यातही सौ. शितल दानवले यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला होता.
आजच्या स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातून उद्योग उभारून, सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून आणि आपल्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळवून देणाऱ्या शितल दानवले यांची यशोगाथा अनेक महिलांसाठी तसेच शेतकरी कुटुंबातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Scroll to Top