कोरेगाव(अजित जगताप) : सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचाराची यंत्रणा अंतिम टप्प्यात आलेली आहे. प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवक यांचे मत महत्त्वाचे ठरले आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव नगरपंचायती मध्ये सध्या शिवसेना स्थानिक नेते राजाभाऊ बर्गे यांच्या संपर्कातील नगरसेवकांनी मोर्चा बांधणी केली आहे. अंतर्गत राजकारणामुळे श्री बर्गे यांच्या करिश्माने महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या अशा पल्लवीत झाल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागलेले आहे.
राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव विधानसभा मतदारसंघात स्थानिक नेते राजाभाऊ बर्गे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तेव्हापासून शिवसेनेमध्ये चैतन्याचे वातावरण पसरलेले आहे. गांधी मैदान सातारा येथे झालेल्या शिवसेना पक्ष प्रवेशाच्या वेळेला युवा नेते राजाभाऊ बर्गे यांच्या दमदार एन्ट्रीने कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार म्हणून श्री बर्गे यांच्याकडे पाहिले जात आहे. सध्या सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी महायुतीचे व महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार यंत्रणेसाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा कामाला लागलेली आहे. असे असले तरी महायुतीमधील दुजाभाव आणि सावतासुभा अजूनही मिटलेला नाही. त्यामुळे महायुतीमधल मतभेद थेट मतपेटीतून स्पष्ट होणार का? याची उत्सुकता लागलेली आहे. शिवसेनेचे वरिष्ठ नेत्यांच्या महायुतीच्या उमेदवारांनी गाठीभेटी घेतल्या असल्या तरी सातारा जिल्हा परिषदेच्या राड्याची गाठ अजून सुटलेली नाही. त्यातच दोन शिवसेना मातब्बर पदाधिकाऱ्यांनी नाराजी प्रकट करून यात चांगलाच खडा टाकलेला आहे.
यापूर्वी देशाचे पंतप्रधान व भाजप नेते नरेंद्र मोदी यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका करणारे पालकमंत्र्यांचे कट्टर समर्थक मुन्ना काझी यांच्या बद्दल भाजप गोटात तीव्र नाराजी पसरली होती. त्याच मुन्ना काझी सोबत निवडणूक प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी कोरेगाव परिसरात बैठक झाल्याचे आता चर्चा रंगू लागलेली आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी प्रचारानिमित्त कोरेगाव येथील अनेक नगरसेवकांची व्यक्तिगत पातळीवर संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात सतरा विधान परिषद निवडणुकीत काही ठिकाणी बिनविरोध निवडून झाले असल्या तरी ज्या ठिकाणी अटीतटीच्या निवडणुका आहेत त्या ठिकाणी मोठा घोडेबाजार सुरू झालेला आहे. याला सातारा सांगली विधान परिषद अपवाद नाही. सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या एकला चलो रे च्या भूमिकेने शिवसेनेने सुद्धा प्रत्युत्तर देण्याचे ठरवले असल्याची चर्चा कोरेगाव मध्ये सुरू झालेली आहे. सातारा सांगली विधान परिषदेच्या कुरुक्षेत्रात महायुती एक संघ ठेवण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न होणे गरजेचे आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना नेते राजाभाऊ बर्गे व काझी यांनी प्रचार यंत्रणेत सक्रिय सहभाग घेण्यासाठी शिवसेना नेते एकनाथ शिंदे व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई काय भूमिका घेतात? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान कोरेगाव नगरपंचायतीमध्ये नगरसेवकांची भूमिका निर्णय ठरणार असल्याने उमेदवार सुद्धा या ठिकाणी सातत्याने संपर्क ठेवून असल्याचे समजते.
______________________
फोटो- शिवसेना प्रवेशाच्या वेळी राजाभाऊ बर्गे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले शंभूराज देसाई (छाया- अजित जगताप कोरेगाव)




