नवी मुंबई : नवी मुंबईतील वाढती लोकसंख्या, पाऊस वेळेत न पडल्यामुळे मोरबे धरणातील पाण्याचा तुटवडा, रायगड जिल्ह्यात नवीन धरणाची निर्मिती, नवी मुंबईकरांना भविष्यात मिळणारे पाणी याबाबत सविस्तर माहिती देतांना नवी मुंबईतील नागरिकांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी लवकरच नवीन धरण उपलब्ध करून देण्यात येईल, अशी सुस्पष्ट ग्वाही ठाणे, पालघर चे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली. ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रांचा कराराचा कालावधी पाच वर्षावरून एक वर्षाचा केल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये असंतोष होता. ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांना या करारासाठी कागद पत्राचा सतत पाठपुरावा करावा लागतो. ज्येष्ठ नागरिकांना करारासाठी होणारा त्रास दूर व्हावा म्हणून सानपाडा नागरिक संघाच्या
वतीने विरंगुळा केंद्रांचे करार कायमस्वरूपी करावे. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्थसंकल्पात आर्थिक निधीची तरतूद केली आहे. हा निधी विरंगुळा केंद्राना उपलब्ध करून केंद्रांच्या विकासासाठी वापरावा. अशी लेखी मागणी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे करण्यात आली . सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव यांनी विरंगुळा केंद्रांच्या कराराबाबत योग्य बाजू मांडल्यानंतर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व वनमंत्री गणेश नाईक यांनी विरंगुळा केंद्रांची करार पाच वर्षाचे करा, अशा प्रकारचे आदेश नवी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे आता लवकरच विरंगुळा केंद्रांच्या कराराचा कालावधी पाच वर्षाचा होणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक अंदाजपत्रकात ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक निधीची तरतूद केल्याबद्दल सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ११ जून २०२६ रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात ग्रहात झालेल्या जनता दरबारप्रसंगी नवी मुंबईचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री, पालघर तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव आणि माजी अध्यक्ष राम काजरोलकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी शिवसेनेचे (उबाठा पक्षाचे) उपशहर प्रमुख अजय पवार यांनी सानपाडा येथील पाणी टंचाई बाबत आणि पामबीच मार्गे येणारी पाण्याची 400 मिमी पाईप लाईन रेल्वे कारशेड जवळी रेल्वे ट्रॅक खालून जोडून देण्यासाठी लेखी निवेदन मंत्री महोदयांना दिले. मंत्री महोदयांनी नवी मुंबईतील वाढती लोकसंख्या, पाऊस वेळेत न पडल्यामुळे मोरबे धरणातील पाण्याचा तुटवडा, रायगड जिल्ह्यात नवीन धरणाची निर्मिती, नवी मुंबईकरांना भविष्यात मिळणारे पाणी याबाबत सविस्तर माहिती दिली.
सत्कार प्रसंगी समाजसेवक गणेश कमळे, सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव जगदीश एकावडे, खजिनदार महादेव पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे, सीमा बोराडे, सहसचिव राजेंद्र कदम, संघाचे माजी खजिनदार विष्णुदास मुखेकर, उपाध्यक्ष बळवंतराव पाटील, माजी सहखजिनदार सुभाष बारवाल, शिवाजी पाटील, सानपाडामधील सामाजिक कार्यकर्ते रणवीर पाटील, तेजाभाई वाडेल, शिरोळे साहेब आदी ज्येष्ठ नागरिक व मान्यवर उपस्थित होते.




