अहिल्यानगर(आनंद शिंदे) : राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून या आंतरजिल्हा रॅकेटचे धागेदोरे आता नाशिकनंतर थेट पुणे आणि कर्जतपर्यंत पोहोचल्याचे तपासातून समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात पुण्यातील वाघोली येथील डॉक्टर अतुल जाधव आणि कर्जत तालुक्यातील मुख्य एजंट राम किसन पवार यांना अटक केली आहे.
या ताज्या कारवाईनंतर प्रकरणातील अटक आरोपींची संख्या तब्बल २१ वर पोहोचली असून त्यामध्ये सात डॉक्टरांचा समावेश असल्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना १६ जूनपर्यंत सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून या रॅकेटची संपूर्ण पाळेमुळे शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे.
तपासादरम्यान पुण्यातून यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीत वाघोली येथील डॉ. अतुल जाधव याचे नाव समोर आले. श्रीरामपूरचे अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या विशेष पथकाने पुण्यात जाऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीत डॉ. जाधव स्वतः सोनोग्राफी मशीनचा वापर करून बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचण्या करत असल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, यापूर्वी नगर तालुक्यातील हातवळण शिवारातील एका झोपडीतून अटक करण्यात आलेला श्रीगोंद्याचा मेडिकल चालक जालिंदर बोरुडे याच्याकडूनही धक्कादायक माहिती समोर आली आहे. तो स्वतः डॉक्टर नसतानाही अनेक गर्भवती महिलांच्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचण्या करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
या काळ्या धंद्यात राम किसन पवार उर्फ तपोश शिबू सरकार (रा. मलठण, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) हा प्रमुख एजंट म्हणून कार्यरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कर्जत येथे छापा टाकून त्याला अटक केली. त्याच्या ताब्यातून बेकायदेशीर गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रतिबंधित गोळ्यांचा मोठा साठाही जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, लोणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे आणि त्यांच्या विशेष पथकाकडून या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे.
या रॅकेटमध्ये आतापर्यंत सात डॉक्टर, तीन मेडिकल चालक, एक वैद्यकीय साहित्य पुरवठादार, एजंट तसेच संबंधित महिलांच्या नातेवाईकांसह एकूण २१ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी कारवाईदरम्यान विविध जिल्ह्यांतून बेकायदेशीर गर्भलिंग निदानासाठी वापरण्यात येणाऱ्या पाच अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन जप्त केल्या आहेत. याशिवाय गुन्ह्यात वापरलेली चार चारचाकी वाहने आणि एक दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यभरात बेकायदेशीर गर्भलिंग निदानाच्या वाढत्या रॅकेटबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



