ताज्या बातम्या

युवा आयोगासाठी सरकार कडे मागणी…. जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक पाठपुरावा

पनवेल (साबीर शेख) : महाराष्ट्र विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पनवेल, नैना, सिडको, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्याशी निगडित तब्बल ३७७ विविध प्रश्न, लक्षवेधी सूचना आणि जनहिताचे विषय राज्य सरकारसमोर प्रभावीपणे मांडणारे आमदार विक्रांत पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत आपल्या कामकाजाचा सविस्तर लेखाजोखा जनतेसमोर मांडला. सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीतील निर्णय, विकासकामांचा आढावा तसेच प्रलंबित विषयांवर सुरू असलेल्या पाठपुराव्याची माहिती त्यांनी यावेळी पत्रकार बांधवांना दिली.अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मांडण्यात आलेल्या अनेक मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाल्याचे सांगताना काही विकासकामे प्रत्यक्ष सुरू झाली असून उर्वरित विषय तातडीने मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सिडकोने अधिग्रहित केलेल्या जमिनींवरील शिक्के काढून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे, मानसरोवर व खांदेश्वर रेल्वे स्थानकांचा विकास, पनवेल एसटी बसस्थानकाचा रखडलेला प्रश्न सोडविणे, गरजेपोटी घरे योजनेची प्रभावी अंमलबजावणी, मॅंग्रोव्ह पार्क, सेंट्रल पार्कचा अपूर्ण विकास पूर्ण करणे, रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी सभागृहात ठोस भूमिका घेतल्याचे त्यांनी सांगितले.तळोजा परिसरात थीम पार्क व अम्युजमेंट पार्क उभारणे, वाढत्या वाहनसंख्येचा विचार करून भविष्यातील पार्किंग समस्यांवर उपाय म्हणून स्वतंत्र पार्किंग भूखंड, बहुमजली पार्किंग प्रकल्प आणि आरक्षित जागांचा विकास करणे, ईएसआयसी हॉस्पिटल उभारणे, पनवेल महानगरपालिकेची स्वतंत्र परिवहन सेवा सुरू करणे, नवीन प्रशासकीय इमारत उभारणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना ठोक मानधन तत्त्वावर सामावून घेणे, एमएमआरडीए रेंटल हाऊसिंग योजनेतील घरे महानगरपालिकेला उपलब्ध करून देणे, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आवश्यक भूखंड उपलब्ध करणे तसेच इंडोर आणि आउटडोर स्टेडियम उभारणे या विषयांचाही सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.नैना प्रकल्पाबाबत बोलताना मुख्यमंत्री यांच्या ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या योजनेत स्थानिक शेतकरी व जमीनधारकांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकृत व अनधिकृत बांधकामांच्या तांत्रिक अडचणी सोडवून सर्वेक्षणाद्वारे नोंदी करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पनवेलकरांच्या घराच्या प्रश्नांबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत, काही योजनांमध्ये जीएसटीचा परतावा देण्याबाबत विचार व्हावा, विविध देयकांवरील अतिरिक्त करांचा पुनर्विचार व्हावा तसेच नागरिकांना वेळेत ताबा हक्क मिळावा यासाठी निश्चित धोरण आखण्याची मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे.नैना व ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी सिडकोमार्फत प्रभावीपणे राबविणे, बहुप्रतिक्षित पनवेल-विरार कॉरिडॉरचे काम गतीने पूर्ण करणे, स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामपंचायतींना टीपी मान्यता प्रक्रियेत सुलभता आणणे यांसारख्या विषयांवरही त्यांनी पाठपुरावा केल्याचे सांगितले.युवकांच्या प्रश्नांबाबत बोलताना आमदार पाटील यांनी राज्यस्तरीय युवा आयोगाची स्थापना करण्याची गरज व्यक्त केली. राज्याच्या विकास प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढावा, रोजगार, कौशल्य विकास आणि धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत त्यांना संधी मिळावी यासाठी युवा आयोग महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो, असे त्यांनी सांगितले. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक अभ्यासिका उभारण्याची मागणीही त्यांनी केली.पनवेलकरांच्या वीज व पाणी समस्यांबाबत महत्त्वाची माहिती देताना त्यांनी सांगितले की, सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे १९५ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर झाला असून शहरात नऊ नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. भविष्यातील वाढती गरज लक्षात घेऊन शिलार धरण प्रकल्पालाही गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच तातडीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी न्हावा-शेवा जलपुरवठा योजनेद्वारे अतिरिक्त एमएलडी पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न शासन स्तरावर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.पत्रकार परिषदेत बोलताना आमदार विक्रांत पाटील म्हणाले की, “मी पनवेलकरांच्या मनातील प्रत्येक प्रश्न शासनापर्यंत पोहोचविण्याचा आणि तो मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. जनतेचे सहकार्य, सूचना आणि मार्गदर्शन यामुळेच अनेक विकासकामांना गती देता आली. आगामी काळातही लोकहिताच्या प्रत्येक प्रश्नासाठी मी कटिबद्ध राहणार आहे.”महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यात विकासकामांना मोठी चालना मिळत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पनवेल, नवी मुंबई, रायगड आणि महाराष्ट्रात विकासाची नवी गती निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.यावेळी व्यासपीठावर भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, माजी तालुका अध्यक्ष तानाजी खंडागळे,नगरसेविका स्नेहल पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आमदार विक्रांत पाटील यांनी केलेल्या लोकहितकारी पाठपुराव्याचे कौतुक करत उपस्थितांनी त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी, अभ्यासू आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे युवा नेतृत्व म्हणून गौरविले.जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत विकास आणि लोकहिताचा अजेंडा पुढे नेणारे नेतृत्व म्हणून आमदार विक्रांत पाटील यांची भूमिका आगामी काळात अधिक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची चर्चा या पत्रकार परिषदेनंतर राजकीय वर्तुळात रंगताना दिसून आली. :::

Scroll to Top