ताज्या बातम्या

“सखा पांडुरंग” ऑनलाइन अभंग गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थ्यांनी अभंगातून व्यक्त केला भक्तिरस

वी मुंबई : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त मानसी सामाजिक संस्था आणि S नॅपकिन बुके’ज सत्कार हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “सखा पांडुरंग” ऑनलाइन अभंग गायन स्पर्धेला विद्यार्थी, पालक आणि विविध शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी संत परंपरेतील अभंग सादर करत भक्ती, संस्कार आणि मराठी सांस्कृतिक वारशाचे सुंदर दर्शन घडविले.
या स्पर्धेत मोरू नारायण म्हात्रे विद्यालय (उलवे), महात्मा स्कूल (खांदा कॉलनी), श्री सुविद्या विद्यालय (कामोठे), महात्मा स्कूल ऑफ अकॅडमी (पनवेल), सौ. भागुबाई ठाकूर स्कूल (उरण), वेस्टर्न हिल्स हायस्कूल (कामोठे), ज्ञानवर्धिनी स्कूल (शिरवळ) यांसह अनेक शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
अथर्व जीवबा पोवार, याद्नी अनिल महाडिक, वैष्णवी नानासाहेब दुधाळ, उत्कर्षा तळेकर, चंदन भगत, ओंकार मंगेश महाडिक आदी विद्यार्थ्यांनी सुरेल अभंग सादर करून परीक्षक व रसिकांची मने जिंकली.
स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना ऑनलाइन ई-प्रमाणपत्र देण्यात येणार असून, लकी ड्रॉद्वारे निवड झालेल्या पाच विद्यार्थ्यांना भगवान श्री विठ्ठल-रुक्मिणी यांची आकर्षक मूर्ती भेटस्वरूप प्रदान करण्यात येणार आहे.
मानसी सामाजिक संस्थेचे संस्थापक डॉ. गोरखनाथ पोळ यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव, संस्कार, मराठी अभंग परंपरेची आवड आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याची प्रेरणा निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. S नॅपकिन बुके’ज सत्कार हाऊसच्या प्रोप्रायटर सौ. सविता गोरखनाथ पोळ यांनी सर्व सहभागी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शाळांचे आभार मानत भविष्यातही अशाच नाविन्यपूर्ण सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला.
“सखा पांडुरंग” हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच मराठी भक्तीपरंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणारा प्रेरणादायी उपक्रम ठरल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

Scroll to Top